‘नेटफ्लिक्स’ला ‘बॉम्बे बेगम्स’ वेब सिरीजचे प्रसारण थांबवण्याची राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची नोटीस

वेब सिरीजमधून लहान मुलांच्या लैंगिक संबंधांचे चित्रण

केंद्र सरकारने वेब सिरीजसाठी बनवलेल्या नियमावलीमुळे वेब सिरीज बनवणार्‍यांवर कोणताही वचक बसलेला नाही, हेच यातून लक्षात येते ! त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानुसार असे चित्रण रोखण्यासाठी कायदाच हवा !

मुंबई – ‘बॉम्बे बेगम्स’ या नेटफ्लिक्स या ओटीटी मंचावरील वेब सिरीजच्या प्रसारणावर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एन्.सी.पी.सी.आर्.ने) बंदी घालण्याची मागणी केली आहे. ८ मार्च या जागतिक महिला दिनी ही वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांच्या लैंगिक संबंधांचे चित्रण दाखवण्यात आल्याचा आरोप असल्याने एन्.सी.पी.सी.आर्.ने बंदीची मागणी केली आहे. ‘या वेब सिरीजचे प्रक्षेपण थांबवा’, अशी नोटीसही नेटफ्लिक्सला पाठवली आहे. त्यावर २४ घंट्यांत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. ‘असे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

१. ‘बॉम्बे बेगम्स’ यामध्ये लहान मुलांना लैंगिक संबंध ठेवतांना आणि अमली पदार्थांचे सेवन करतांना दाखवण्यात आले आहे. ‘अशा प्रकारच्या चित्रणामुळे समाजावर विपरीत परिणाम होतो. समाजात चुकीचा संदेश पोचतो. यामुळे लहान मुलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढू शकते. अशी दृश्ये चुकीच्या घटनांना प्रोत्साहन देतात’, असा आरोप एन्.सी.पी.सी.आर्.ने नेटफ्लिक्सच्या विरोधात केला आहे.

२. वेब सिरीजमध्ये टिळा लावलेला एक नेता दाखवण्यात आला आहे. तो श्रीमद्भगवदगीतेचा हवाल देत ‘पुरुषांच्या भावनेची तृप्ती करणे, हा स्त्रीचा सर्वोच्च धर्म आहे’, असे म्हणतांनाही दाखवण्यात आले आहे. (यावरून या वेब सिरीजमधून ‘श्रीमद्भगवद्गीता ही स्त्रीविरोधी आहे’, असे दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न करण्यात आला आहे. अशा वेब सिरीजला हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक ! – संपादक)

३. या वेब सिरीजमध्ये पूजा भट्ट यांची मुख्य भूमिका असून मुंबईतील विविध क्षेत्रांतील ५ महिलांच्या जीवनावर ही वेब सिरीज आधारित आहे.