‘आयएन्एस् करंज’ ही पानबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाणारी ‘आयएन्एस् करंज’ ही अत्याधुनिक पाणबुडी १० मार्च या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. मुंबई येथील पश्‍चिम कमांड नौदलाच्या मुख्यालयामध्ये नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमवीर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. केंद्रशासनाच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या अंतर्गत ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.’ या मुंबई येथील जहाजबांधणी कारखान्याला कलवरी श्रेणीतील ६ स्कॉर्पियन पाणबुड्यांचे काम देण्यात आले आहे. यापैकी नौदलाच्या ताफ्यात दाखल होणारी ‘आयएन्एस् करंज’ ही तिसरी पाणबुडी आहे, तर याच श्रेणीतील ‘वेल्ला’ आणि ‘वागीर’ या अन्य २ पाणबुड्यांच्या चाचण्या चालू आहेत.

‘आयएन्एस् करंज’ ही २२१ फूट लांब आणि ४० फूट उंच असून तिचे वजन १ सहस्र ५६५ टन एवढे आहे. तिचा वेग प्रतिघंटा २२ नॉट्स इतका आहे. ‘५ स्टील्थ’ तंत्रज्ञानानेे सज्ज असल्याने ही पाणबुडी शत्रूच्या रडारच्या कक्षेत येत नाही, तसेच कोणत्याही हवामानात काम करण्यास ही पाणबुडी सक्षम असून अधिक काळ पाण्याखाली रहाण्याची तिची क्षमता आहे.