महिलेशी अनैतिक संबंध ठेवून मुलाला वार्यावर सोडल्याचा, तसेच आत्महत्येच्या गुन्ह्यातील नाव वगळायला लावल्याचा आरोप
मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – महाविकास आघाडीतील एका आमदाराने महिलेशी अनैतिक संबंध ठेवून तिच्यापासून झालेल्या अपत्याला वार्यावर सोडले, तसेच कांदिवली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या एका आत्महत्या प्रकरणातील ‘एफ्.आय.आर्.’ मधील स्वत:चे नाव पैसे देऊन वगळायला लावले, असे गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. ३ मार्च या दिवशी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करतांना ते बोलत होते. या वेळी पुराव्याची कागदपत्रे प्रवीण दरेकर यांनी उपसभापती (सौ.) नीलम गोर्हे यांना सादर केली असून या प्रकरणी ‘सी.आय्.डी.’ चौकशी करण्याची मागणी केली.
या वेळी आरोप करतांना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. आमदार किंवा मंत्री झालो म्हणून काहीही हैदोस घालण्याची अनुमती मिळत नाही. या प्रकरणातील आमदाराने नाव सांगून मी त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगत नाही. याचे पुरावे मी सभागृहात सादर करत आहे; मात्र पुरावे सादर केल्यावर पीडित महिला आणि तिच्या मुलाला संरक्षण द्यावे. या प्रकरणी पीडित महिलेच्या मुलाने आमदार असलेल्या स्वत:च्या वडिलांच्या विरोधात याचिका प्रविष्ट करून स्वत:च्या आणि स्वत:च्या वडिलांचे ‘डी.एन्.ए.’ तपासण्याची मागणी केली आहे. संपत्ती, नैतिकतेचा अभाव आणि गुंडगिरी यांच्या जोरावर या आमदाराने स्वत:वरील गुन्हा काढायला लावला. बोरीवली येथील खादी ग्रामोद्योगासाठीच्या १६ एकर भूमीवर स्वत:चा हक्क प्रस्थापित केला आहे. यामध्येही या आमदाराचे नाव आहे.’’