मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील ३३ कोटी वृक्ष लागवडीची आता चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी ३ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली, तसेच वृक्ष लागवडीच्या संदर्भात ३१ मार्चपर्यंत चौकशी समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यातील वृक्ष लागवडीविषयी सदस्य रमेश कोरगांवकर यांनी हा प्रश्न विचारला होता.
त्या वेळी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी ‘वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार का ? तसेच देवेंद्र फडणवीस यांचे वृक्ष लागवडीचे ‘ड्रीम प्रोजेक्ट्स’ यशस्वी झाले का ?’, असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देतांना भरणे यांनी विधिमंडळ समिती नेमली जाणार असे सांगितले. या समितीद्वारे ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत खासगी संस्थेने केलेल्या आर्थिक योगदानाची माहिती पडताळली जाईल, तसेच राज्य सरकारकडून किती पैसे व्यय करण्यात आले आणि वृक्ष लागवडीनंतर किती वृक्ष जगले, याची चौकशी केली जाईल. ‘झाडांचे संवर्धन करण्यासाठी ३५२ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे’, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, समिती पुढील ४ मास चौकशी करेल. त्या कालावधीत त्यांना माहिती मिळण्यास अधिकचा वेळ म्हणून २ मास वाढवून देण्यात येतील. अशा प्रकारे ६ मासांत ती समिती अहवाल सादर करेल.