पणजी, ३ मार्च (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ग्रेटा थनबर्ग ‘टूलकिट’ प्रकरणी २९ वर्षीय गोवास्थित पर्यावरण कार्यकर्ते शुभमकार चौधरी यांना ‘ट्रान्सीट’ जामीन संमत केला आहे. शुभमकार चौधरी यांच्या मते त्यांना खोट्या आरोपांखाली या प्रकरणात गोवण्यात आले आहे. या प्रकरणी यापूर्वी बेंगळुरूस्थित पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला अटक करून तिची पुढे जामिनावर सुटका झाली आहे.
४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी प्रविष्ट केलेल्या प्रथमदर्शनी अहवालाच्या (एफ्.आय.आर्.) आधारावर देहली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने शुभमकार चौधरी यांना अटक केली होती. शुभमकार चौधरी यांना ५० सहस्र रुपये हमीवर जामीन संमत करण्यात आला आहे. तत्पूर्वी ते न्यायालयात म्हणाले, ‘‘मी ऑगस्ट २०२० पासून गोव्यात वास्तव्यास आहे. गोव्यातील ‘खाजन’ भूमीला संयुक्त राष्ट्राचा कृषी वारसा दर्जा मिळावा, यासाठी मी प्रयत्न करत आहे.’’