हुक्का पार्लर, पब आणि डान्स बार प्रकरणी विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदार आक्रमक
शासनाला जर खरोखरच यावर कारवाई करायची असेल, तर त्याने संबंधित अधिकार्यांचे केवळ निलंबन नव्हे, तर त्यांना बडतर्फ करून कठोर कारवाई करणे आवश्यक. असे केले, तरच प्रशासकीय यंत्रणांमध्ये अवैध गोष्टींवर कारवाई करण्याचे गांभीर्य निर्माण होईल !
मुंबई, २ मार्च (वार्ता.) – हुक्का पार्लर हा केवळ मुंबईचा नव्हे, तर संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डान्स बार आणि हुक्का पार्लर आढळल्यास त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्याला उत्तरदायी धरण्यात येईल, असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. २ मार्च या दिवशी ठाणे जिल्ह्यात चालू असलेल्या हुक्का पार्लरप्रकरणी शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या वेळी ‘या प्रकरणी किती ठिकाणी कारवाई करण्यात आली ?’ असा प्रश्न उपस्थित केला; मात्र याची आकडेवारी गृहमंत्र्यांनी सभागृहात सादर केली नाही.
Police station head to be held accountable for hookah parlours, says @AnilDeshmukhNCP https://t.co/b3jV0hxLdf
— Free Press Journal (@fpjindia) March 3, 2021
ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर येथे ‘हरिकोम’ नावाचा डान्स बार चालू असून त्यावर पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात येत नाही, असे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी सभागृहात सांगितले. त्यावर गृहमंत्री देशमुख यांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
वरळी येथील पोलीस अधिकार्यांवर २ दिवसांत कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
वरळी येथे दिवसाढवळ्या पब चालू असून पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून तेथील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्याची मागणी केली. यावर अनिल देशमुख यांनी २ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.