बुलढाणा – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेगाव येथील संत गजानन महाराज यांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. मंदिर प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. आतापर्यंत ई-पासच्या आधारे लाखो भाविकांनी येथे दर्शन घेतले आहे; मात्र आता कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्यामुळे नियमांची कठोर कार्यवाही येथे चालू करण्यात आली आहे.
कोरोनाचे नियम न पाळणार्यांच्या विरोधात कारवाईसाठी सांगली महापालिका आयुक्त रस्त्यावर उतरले
सांगली – कोरोनाचे नियम न पाळणार्यांच्या विरोधात कारवाईसाठी सांगली, मिरज आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस रस्त्यावर उतरले आहेत. आयुक्तांनी शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी अचानक भेट देत पडताळणी केली. यात अनेक ठिकाणी विनामास्क असणारे नागरिक, व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३५ सहस्र ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
पुण्यात पुन्हा जुनेच भाग ‘हॉटस्पॉट’ !
पुणे – येथून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणार्यांची आणि तेथून पुण्यात येणार्यांची संख्या अधिक आहे. तसेच गेल्या वेळी जे ‘हॉटस्पॉट’ होते, त्याच ठिकाणी पुन्हा बाधित रुग्णांची संख्या दिसून येत आहे. त्यामुळे हे परिसर ‘मायक्रो कन्टेन्मेंट झोन’ म्हणून घोषित केले आहेत. या भागात ये-जा करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र ते पत्रा लावून बंद करण्यात येणार नसल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या पुण्यात भवानी पेठ, शिवाजीनगर, ढोले-पाटील रस्ता परिसर, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, कोथरूड हे परिसर, तर पिंपरी-चिंचवडमध्ये चिंचवड, भोसरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव हे परिसर ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित केले आहेत. येथील बाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर २ दिवसांत चालू केले जातील. तसेच आवश्यकता भासल्यास जम्बो सेंटरही चालू केले जाणार आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्ण हे एकाच कुटुंबातील अधिक असल्याचे निदर्शनास येत असल्याचेही विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
सातार्यात २२ फेब्रुवारीपासून संचारबंदी !
सातारा – जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर उपाययोजना काढण्याच्या दृष्टीने बैठक पार पडली. या बैठकीत सातारा जिल्ह्यात तात्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संचारबंदी पुणे-बेंगळुरू महामार्ग वगळता संपूर्ण सातारा जिल्ह्यात २२ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत असणार आहे. सर्वच हॉटेल्स रात्री ११ नंतर बंद रहातील. जिल्ह्यातील शाळा चालू रहाणार असून वैद्यकीय पथके शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहेत.