तीव्र त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या अन् साधकांना साधनेत साहाय्य करून त्यांना घडवणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

माघ शुद्ध नवमी (२१.२.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. पूनम साळुंखे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या त्यांच्या सहसाधिका कु. सोनल जोशी यांना लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आपण २० फेब्रुवारी या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/452772.html

५. इतरांसाठी सतत त्याग करणे आणि कर्तेपणा न घेणे

ती प्रत्येक प्रसंगात आधी दुसर्‍याचा आणि नंतर स्वतःचा विचार करते. एकदा एका प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टर तिला म्हणाले होते, ‘‘देवाने तुला मुक्ती द्यायला द्वार उघडल्यासही तू आधी ‘अन्य जाऊ देत. मग मी जाते असे म्हणणार ना !’’ ती बर्‍याच प्रसंगांमध्ये साधकांच्या हितासाठी त्यांच्या नकळत बरेच साहाय्य करते. तिने याविषयी कधी बोलून न दाखवल्याने संबंधित साधकाला त्याविषयी कळतही नाही; पण तिचा त्याग भगवंताच्या चरणी पोचतोच. परात्पर गुरु डॉक्टर एका प्रसंगात तिला म्हणाले होते, ‘‘देव सर्व करूनही पडद्यामागे असतो. तो सतत कर्माचे श्रेय दुसर्‍याला देतो. तुझे तसे आहे ना.’’

कु. सोनल जोशी

६. साधकांना साधनेत साहाय्य करून त्यांना घडवणे

ती संपर्कातील सर्व साधकांना साधनेत पुष्कळ साहाय्य करते. संत अनेक साधकांना पूनमशी बोलायला सांगतात. ‘ज्या साधकांना मोकळेपणाने बोलता येत नाही, त्यांनी पूनमशी बोलल्यावर त्यांना हळूहळू मोकळे होण्याचा आनंद अनुभवता येतो’, हे मी इतरांच्या संदर्भातही अनुभवले आहे.

​आरंभी मला ‘साधकांशी जवळीक कशी साधायची’, हे कळत नसे. तिच्या समवेत राहिल्याने मला ‘प्रेम कसे व्यक्त करायचे, दुसर्‍यासाठी कसे जगायचे आणि इतरांना झोकून देऊन साहाय्य कसे करायचे’, हे शिकायला मिळाले.

एका साधकाला प्रसंगांना सामोरे जाता येत नसल्याने त्याचा रक्तदाब वाढायचा. तो पूनमशी काही वर्षे बोलत असल्याने आणि तिचे ऐकल्याने त्याला हळूहळू बर्‍याच प्रसंगांत शांत राहून सेवा करता येत आहे.

७. भावपूर्ण सेवा करणे

७ अ. अत्यंत एकाग्रतेने अल्प वेळेत बिनचूक सेवा करणे : तिच्याकडे छायाचित्र पुस्तक (फोटो अल्बम) बनवण्याची सेवा, तसेच ध्वनिचित्रीकरणासाठी बनवलेले ‘व्हिडिओ’ पडताळून एका संतांना दाखवायची सेवा असते. ती एकाग्रतेने सेवा करते. एकदा ती सेवा करत असतांना एक संत तिच्या शेजारी येऊन बराच वेळ उभे राहिले, तरी तिला त्याची जाणीव झाली नाही. काही वेळाने त्यांनी तिला हाक मारल्यावर तिच्या लक्षात आले, ‘ते तिच्या शेजारी उभे राहिले आहेत.’ त्या संतांनीही तिची सेवेतील एकाग्रता पाहून तिचे कौतुक केले. पूनम अल्प वेळेत परिपूर्ण सेवा करते. तिला शारीरिक, तसेच आध्यात्मिक त्रासामुळे सकाळी उठायला जमत नाही; म्हणून ती बर्‍याच वेळा रात्री सेवा करते. ती काही वेळा संपूर्ण रात्र जागून सेवा पूर्ण करते.

७ आ. ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’ या भावाने सेवा करणे : ‘काही वेळा गुरूंना अपेक्षित असे करण्यात अल्प पडत आहोत’, हे गुरूंनी न सांगता तिच्या लक्षात येते. गुरूंच्या मनातील जाणण्याची तिची पुष्कळ तळमळ असते. ती सेवेतील त्रुटी शोधून त्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करते. काही वेळा पूनमच्या ते लक्षात आले नाही, तर ती सतत क्षमायाचना करते. त्यानंतर काही वेळा असे होते, ‘संत तिच्यासाठी काहीतरी निरोप पाठवतात किंवा काहीतरी सांगतात.’ तेव्हा तिची क्षमायाचना त्यांच्या चरणांजवळ पोेचल्याचे जाणवते.

बर्‍याच वेळा साधक उत्तरदायी साधकांना विषय सांगायच्या आधी तिचे मत घेतात. त्या वेळी तिने साधकांना जे प्रश्‍न विचारलेले असतात, तेच प्रश्‍न त्यांना संत किंवा उत्तरदायी साधक विचारतात. यातून तिच्यातील ‘विषयाचा योग्य अभ्यास करणे आणि गुरूंचे मन जाणणे’, हे शिष्याचे गुण अनुभवायला येतात.

७ इ. संतांनी ध्वनीचित्रीकरणाचे संकलित झालेले विषय पडताळून अंतिम करण्यास सांगणे आणि त्या सेवेसाठी तिला घडवणे : एका संतांनी तिला ध्वनीचित्रीकरणाचे संकलन झाल्यावर ते पडताळण्याची सेवा करायला सांगितले. तिला त्या विषयाचे ज्ञान नाही; पण तिचे निरीक्षण चांगले असल्यामुळे ती समष्टीचा विचार करून त्यातील उणिवा सांगू शकते. संतांना ‘काय अभिप्रेत आहे ?’, हे ती नीट समजून घेऊन संबंधित साधकांना त्यात सुधारणा करायला सांगते. काही वेळा आम्हाला या सेवेचा अनुभव असूनही तिच्यासारखी काही सूत्रे आमच्या लक्षात येत नाहीत.

८. तत्त्वनिष्ठतेने चुका सांगणे

आरंभी तिने सांगितलेल्या चुका समजून घेतांना माझ्या मनाचा संघर्ष होत होता. मला काही वेळा ते स्वीकारताही येत नव्हते. माझ्या मनात तिच्याविषयी प्रतिक्रिया असायच्या. ‘ती मला समजून घेत नाही’, असे वाटायचे. नंतर माझ्या हळूहळू लक्षात आले, ‘गुरुमाऊलीच तिच्या माध्यमातून माझ्या हितासाठी सांगत आहे. त्यांनीच तिला माझ्या लहानसहान चुका सांगून मला साधनेत साहाय्य करण्याची बुद्धी दिली.’ तेव्हा माझ्यातील ‘समजून न घेणे’ या माझ्या स्वभावदोषाची मला जाणीव झाली. तेव्हापासून मला तिचा माझ्या हितासाठीचा उद्देश पहाता आला आणि त्या कृतज्ञतेपोटी मला सर्व स्वीकारायला अन् शिकायला सोपे गेले.

९. सूक्ष्म स्पंदनांवरून संत आणि साधक आल्याचे ओळखणे

​आम्ही रहातो तिकडे खोलीचा दरवाजा आणि खोली यामध्ये एक आडवी भिंत आहे. बर्‍याच वेळा आम्हाला साधक दिसेपर्यंत ‘खोलीत कोण येत आहे ?’, ते कळत नाही; पण पूनमला काही संत, तसेच काही साधक यांची चाहुल लागून कोण येत आहे ?’, ते कळते. बर्‍याच वेळा ‘संत तेथे येत आहेत’, हे तिला कळते. प्रत्यक्षात ते चालतांना आम्हाला त्यांचा आवाज येत नाही; मात्र तिला ‘ते येत आहेत’, हे समजते. तिचे सूक्ष्म स्पंदनांचे ज्ञान, तसेच संतांची चाहुल ओळखण्यासाठी त्यांच्यावरील तिची प्रीती लक्षात येते.

१०. कृतज्ञता आणि प्रार्थना

परात्पर गुरु डॉक्टर, ही सूत्रे लिहितांना ‘मी तुमची स्तुती करत आहे’, याची मला जाणीव होत होती. पूनमसारखे साधक हिरे आहेत; पण त्यांना खाणीतून हेरणारे भगवंत तुम्हीच आहात. हे सर्व लिहितांना मला केवळ तुमच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. तुम्ही प्रत्येक बाळाला सांभाळायला ‘आईची’ उत्पत्ती केली, तसेच साधनेत आलेल्या प्रत्येक जिवाला तुम्ही गुरुस्वरूप गुरुबंधू जोडून ठेवलेले आहेत. ‘जीव कधीच एकटा नसतो’, हे अध्यात्मात आल्यावर खर्‍या अर्थाने समजते. ‘गुरुराया, या तुझ्या अनमोल साधकांकडून आम्ही घडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना आम्हाला करता येऊ देत.’ ‘आम्ही काही करो किंवा न करो, तुमची आमच्यावरील कृपा अशीच रहाणार आहे’, हे प्रत्येक क्षणी अनुभवता येते. तुमच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

(समाप्त)

– कु. सोनल जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२१)