तीव्र त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या अन् साधकांना साधनेत साहाय्य करून त्यांना घडवणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

माघ शुक्ल पक्ष नवमी (२१.२.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. पूनम साळुंखे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी काढलेले कौतुकोद्गार !

१. पूनममध्ये मूलतःच स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे साधकांची तिच्याशी लवकर जवळीक होते. साधकांना तिचा आधार वाटतो.

२. तिच्या जीवनात येणार्‍या सर्व अडचणींमागे १०० टक्के आध्यात्मिक कारण आहे. तिचा त्रास हळूहळू न्यून झाल्यावर तिच्यातील खरी पूनम कशी आहे ?, ते आपल्याला पहायला मिळेल. मग तिची प्रगती लवकर होईल.

३. साधक अनेक वेळा पूनमला तू देवाची एवढी लाडकी कशी ?, असे विचारतात, असे मी (कु. सोनल जोशी) परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, पूनम देवाची लाडकी आहे, असे सर्व म्हणतात. ती कोणत्या गुणांमुळे लाडकी आहे ?, हे साधकांनी तिला विचारून तिच्याकडून शिकायला पाहिजे.

४. पूनम पुष्कळ एकाग्रतेने सेवा करते. तिला सेवेतील बारकावे चांगल्या प्रकारे समजतात. तिच्यात पुष्कळ क्षमता आहे.

५. तिला साधकांविषयी पुष्कळ प्रीती आहे ना ? साधक तिच्याशी बोलायला वाट बघत असतात.

६. काही वेळा काही प्रसंगांमुळे पूनमला स्वतःच्या साधनेची काळजी वाटते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर तिला म्हणतात, तुझा त्रास अल्प झाला की, तू लवकर पुढे जाणार. तू पुढे गेल्यावर तू जेव्हा मागे वळून पहाशील, तेव्हा तू स्वत:च हसशील की, मी असे विचार कसे करत होते ?

७. तिला लहान वयात सर्व शारीरिक त्रास भोगावे लागले; पण तिच्या तोंडवळ्यावरून तिला त्रास होतो, हे कळतच नाही ना ? तिने सांगितल्यावरच समजते.

कु. पूनम साळुंखे

कु. पूनम साळुंखे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कु. पूनम साळुंखे यांची गुणवैशिष्ट्ये सांगावी तितकी अल्प आहेत. गुरूंचे एक रूप असलेल्या आणि साधकांना साधनेत योग्य मार्गदर्शन करून साहाय्य करणार्‍या या मैत्रिणीविषयी तिच्या वाढदिवसानिमित्त काही बोबडे बोल सांगायचे प्रयत्न करत आहे. तिच्या सान्निध्यात राहून भगवंताने मला पुष्कळ शिकायला दिले आणि तिचे प्रेम अनुभवायला मिळाले. ते त्याच्याच चरणी अर्पण करते.

कशा बांधिल्या प्रेमाच्या या गाठी रे । जगी खरीच बा ही नाती रे ॥

आध्यात्मिक मैत्रिणी – डावीकडे कु. सोनल जोशी आणि कु. पूनम साळुंखे !

१. साधकांवर निरपेक्ष प्रेम करणे

पूनम सर्वांवर निरपेक्ष प्रेम करण्याचा प्रयत्न करते. तिला साधकांकडून क्वचित् प्रसंगीच अपेक्षेचा विचार असतो, तरीही तिचे साधकांवरील प्रेम अल्प होत नाही. साधिका तिच्याशी कशी वागते ?, यापेक्षा स्वतःची साधना होण्यासाठी स्वतः कसे वागायला पाहिजे ?, हे लक्षात घेऊन ती इतरांवर प्रेम करण्याचे प्रयत्न करते. मी याविषयीचे अनुभवलेले काही प्रसंग येथे दिले आहेत.

अ. एकदा सेवा करून झाल्यावर माझे पाय फार दुखत होते. मी पूनमला याविषयी काही सांगितले नव्हते; पण तिला याविषयी समजल्यावर मी रात्री झोपल्यावर ती माझे पाय चेपत होती. मी झोपेत असल्याने मला हे आरंभी कळले नाही. मी थोड्या वेळाने उठून पाहिले, तर पूनम बराच वेळ माझे पाय चेपत होती. स्वतःला तीव्र आध्यात्मिक आणि शारीरिक त्रास असतांनाही ती कसे प्रेम करते ! हे मला अनुभवायला आले. ती खोलीत झोपायला येत असलेल्या अन्य साधिकांचेही त्यांनी न सांगता पाय चेपून देते.

आ. मला सेवा करतांना काही प्रसंगांमुळे पुष्कळ ताण यायचा. तेव्हा पूनम मला ताण घ्यायला नको, हे प्रेमाने समजून सांगायची. मी तिला मनातील सांगितल्यावरच माझा भार ९० टक्के हलका व्हायचा. त्यातून मला साधनेसाठी दिशाही मिळायची. माझ्यातील कोणत्या अहंच्या पैलूमुळे मला असे होते, ते ती मला दाखवून द्यायची आणि त्याच्यावर लगेच काय प्रयत्न करायला पाहिजे, हेही ती सहजतेने समजावून सांगायची. तिला माझी मैत्रीण संबोधण्यापेक्षा गुरु शिष्याला पुष्कळ प्रेमाने साधनेच्या सर्व अडचणींमधून शिकवत पुढे नेतात, त्या गुरूंचेच (प.पू. डॉक्टरांचेच) ती एक रूप आहे, असे मला वाटते.

२. स्वतःचे दुःख विसरून इतरांना साहाय्य करणे

एक दिवस तिला पित्त झाल्यामुळे तिचे डोके दुखत होते. त्यामुळे तिला रात्रभर झोप लागली नाही. तिने विश्रांती घेऊनही तिचे डोके दुखायचे थांबले नाही. काही वेळाने एक साधिका पूनमशी बोलायला आल्यावर पूनम स्वत:चे सर्व विसरून साधिकेच्या विषयाशी समरस होऊन गेली. ती साधिका त्यातून कशी बाहेर पडणार ?, असे पूनमचे प्रयत्न होते. त्या वेळी पूनमने माझे डोके दुखत आहे. मला बरे नाही, असे एकदाही म्हटले नाही. मी पुष्कळ वेळाने त्या साधिकेला त्याविषयी सांगितल्यावर त्या साधिकेच्या लक्षात आले आणि तिने पूनमला विश्रांती घ्यायला सांगितले. तेव्हा पूनमला पाहून मला वाटले, मी तिच्या ठिकाणी असते, तर मला एवढे सहन करून दुसर्‍याशी बोलायला जमले असते का ? पूनम स्वत:चे दुःख विसरून इतरांना महत्त्व देते.

३. साधकांच्या अडचणी सोडवून आधार देणे

पूनमच्या बोलण्यातून आणि सहवासातून साधकांना आधार मिळतो. तिने कधीच कुणाविषयी अयोग्य विचार केलेला मला आठवत नाही. संत अनेक साधकांना पूनमकडून साधनेविषयी मार्गदर्शन घ्यायला सांगतात. तिच्याकडे येणारा प्रत्येक साधक साधनेत पुढे कसा जाईल, याविषयीचे विचार तिच्या मनात सतत असतात. त्या साधकांच्या अडचणी सोडवणे, त्यांची काही सूत्रे लक्षात आल्यास त्यांच्या स्थितीला जाऊन सांगणे आणि त्यांना आधार देणे, असे ती करते.

साधकही त्यांच्या जीवनातील प्रसंग मनमोकळेपणाने तिला सांगतात. तिचे बोलणे आधार देणारे असते. ती साधकांना त्यांच्याप्रती असलेल्या प्रेमभावामुळे सांगत असते, असे जाणवते. पूनमला मनातील प्रसंग सांगितल्यावर साधकांना हलके वाटून आनंद मिळतो. साधक तिच्याशी बोलण्यासाठी वाट बघत असतात; पण काही वेळा तिची प्रकृती बरी नसल्याने आणि सेवेतील व्यस्ततेमुळे तिला यासाठी वेळ अपुरा पडतो.

संत साधकाला मार्गिकेत जरी भेटले, तरी एक प्रकारचा आधार देतात. त्यातून त्या साधकाला ते माझ्यासाठी आहेत, अशी त्यांच्याविषयी श्रद्धा निर्माण होते. पूनम आश्रमातील मार्गिकेतून जातांना थोडे थांबून साधकांशी बोलते. ती सर्वांना चांगला प्रतिसाद देते. त्यामुळे साधकांना तिचा आधार वाटतो. तिलाही त्यातून पुष्कळ आनंद मिळतो.

४. तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही आनंदी राहून सेवा करणे

तिला तीव्र शारीरिक, तसेच आध्यात्मिक त्रास असूनही तिच्या तोंडवळ्यावर सतत आनंद असतो. काही वेळा काही दु:खदायक प्रसंग घडले, तरीही तिच्या तोंडवळ्यावर तसे दिसत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी तिला सांगितले, तुला आध्यात्मिक त्रास झाला किंवा कोणत्याही प्रसंगाचे दु:ख वाटले, तरी त्याचा केवळा तुझ्या बाह्य मनावर परिणाम होतो. तुझ्या अंतर्मनावर आनंदाचा संस्कार असल्याने तुला एवढा त्रास असूनही तुझ्या तोंडवळ्यावर आनंदच दिसतो.

अनेक वर्षांपासून तिच्या शरिरातील लोहाचे प्रमाण अल्प आहे. त्यासाठी तिला सलाईनच्या २ – ३ बाटल्या ६ – ७ मासांनी लावल्या जातात, तरीही तिच्या शरिरातील लोहाचे प्रमाण अपेक्षित असे वाढत नाही. हे तिच्या आध्यात्मिक त्रासामुळे आहे, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले. तिला सकाळी उठून दैनंदिन कृती करायला थकवा असतो, असे वैद्य म्हणाले होते. असे असूनही ती सकाळी जाग आल्यावर अंथरूणावर पडून सेवेचे संदेश (मेसेज) पहाणे, त्यांना उत्तरे देणे किंवा सेवेचे समन्वय करणे, चालू करते.

तिला कंबर दुखण्याचा तीव्र त्रास आहे. तिला अनेक वर्षे रात्रभर पाय आणि कंबर यांच्यातील वेदनांमुळे झोप यायची नाही. ती काही वेळा वेदनांमुळे रात्रभर तळमळत असायची. त्या वेळी मला तिची स्थिती पहावत नसायची. प्रतिदिन रात्री १२ वाजल्यावर तिला त्रास व्हायला लागायचा. मला ते पाहून रडायला यायचे आणि मी देवाला प्रार्थना करायचे, पूनमचे भोग उणावू देत. तिला एवढा त्रास असूनही ती आनंदी राहून तिच्या क्षमतेपेक्षा अधिक सेवा करण्याचा प्रयत्न करते. एवढ्या लहान वयातही तिची सहनशक्ती प्रचंड असल्याचे जाणवते.

एकदा एका संतांनी तिला सांगितले, मलाही थकवा असतो; म्हणून मला तुझी कशी स्थिती होत असेल, हे अनुभवता येते. व्यक्तीला थकवा असल्यास ती झोपू शकते; पण तुझ्यासारख्या वेदना सहन करणे फार कठीण आहे.

– कु. सोनल जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(३०.१.२०२१)

(क्रमश: सोमवारी)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453370.html

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.