मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी
मुंबई – कार्यालयीन कामाची सकाळी १० ते सायंकाळी ५ या पारंपरिक वेळेची मानसिकता पालटून वेगवेगळ्या वेळांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. २० फेब्रुवारी या दिवशी नीती आयोगाच्या ६ व्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी वरील मागणी केली.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आम्ही आपत्तीला संधीमध्ये पालटत आहोत. मागील वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला. इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोचवणे आमचे उद्दिष्ट आहे. ‘भारत नेट’च्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचे जाळे पसरवणे चालू असले, तरी दुर्गम भागातील २ सहस्र ५०० पेक्षा अधिक गावे आणि खेडी यांमध्ये अद्यापही इंटरनेट आणि भ्रमणभाष ‘कनेक्टिव्हिटी’ पोचलेली नाही. केंद्रशासनाने याकडे लक्ष घालून ही सुविधा लवकरात लवकर कशी मिळेल, ते पहावे. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद आणि चांगला लाभ मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्न करत आहे. केंद्रशासनाने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे.’’