‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, शिशिरऋतू, माघ मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. शुक्र पूर्व लोप (अस्त) : २१.२.२०२१ पासून १६.४.२०२१ पर्यंत शुक्र ग्रहाचा अस्त आहे. प्रत्येक वर्षी सूर्य सान्निध्यामुळे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह अस्तंगत होत असतात. त्यामध्ये धर्मशास्त्राने आणि मुहूर्त शास्त्रकारांनी गुरु अन् शुक्र यांच्या अस्तंगत कालावधीस विशेष महत्त्व दिले आहे. अस्तंगत कालावधी मंगल कार्यासाठी आणि अनेक प्रकारच्या धार्मिक कृत्यांसाठी वर्ज्य करावा.
२ आ. अमृत योग : अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. २२.२.२०२१ या दिवशी हा योग सकाळी १०.५८ पर्यंत आहे.
२ इ. दग्ध योग : दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. २२.२.२०२१ या दिवशी सोमवार असून सायंकाळी ५.१७ नंतर एकादशी तिथी असल्याने सायंकाळी ५.१७ नंतर पासून मंगळवारी सूर्योदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे.
२ ई. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. २२.२.२०२१ या दिवशी उत्तररात्री ५.४७ पासून २३.२.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.०६ पर्यंत आणि २६.२.२०२१ या दिवशी दुपारी ३.५० पासून उत्तररात्री २.५३ पर्यंत विष्टी करण आहे.
२ उ. जया एकादशी : माघ शुक्ल पक्ष एकादशीला ‘जया एकादशी’ म्हणतात. या दिवशी श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णु यांची पूजा करतात. ‘जया एकादशीच्या व्रताने जय प्राप्त होतो, तसेच भौतिक आणि ऐहिक सुख प्राप्त होते’, असे मानले जाते.
२ ऊ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २३.२.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.०६ पासून २४.२.२०२१ दुपारी १.१७ पर्यंत आणि २५.२.२०२१ या दिवशी दुपारी १.१७ पासून सायंकाळी ५.१९ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ए. यमघंट : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने ‘यमघंट योग’ होतो. २३.२.२०२१ या दिवशी सूर्योदयापासून दुपारी १२.३१ पर्यंत मंगळवार आणि आर्द्रा नक्षत्र एकत्र आल्याने ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.
२ ऐ. बुधप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. बुधवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘बुधप्रदोष’ किंवा ‘सौम्यवार प्रदोष’ म्हणतात. शिक्षण, ज्ञानप्राप्ती आणि मनोकामना पूर्तीसाठी ‘सौम्यवार प्रदोष’ हे व्रत करतात.
२ ओ. भीष्मद्वादशी : माघ शुक्ल पक्ष द्वादशीला ‘भीष्मद्वादशी’ म्हणतात. महाभारतात पितामह म्हणून ओळखल्या जाणार्या गंगापुत्र देवव्रत, म्हणजे भीष्माचार्यांनी माघ शुक्ल पक्ष अष्टमीला देह ठेवला; परंतु त्यांची उत्तरक्रिया माघ शुक्ल पक्ष द्वादशीला करण्यात आली; म्हणून या द्वादशीला भीष्मद्वादशी म्हणतात.
२ औ. गुरुपुष्यामृत योग : गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. २५.२.२०२१ या दिवशी सकाळी ९.४१ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभ कार्ये करणे’, असा प्रघात आहे. साधकांनी ‘गुरुपुष्यामृत योगा’वर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे.
२ अं. कल्पादि : माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी या तिथीला ‘कल्पादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. २५.२.२०२१ या दिवशी सूर्योदयापासून सायंकाळी ५.१९ पर्यंत माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथी आहे.
२ क. माघस्नान समाप्ती : माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयकाली माघस्नान समाप्ती होते. दोन दिवस सूर्योदयकाली पौर्णिमा तिथी असल्यास दुसर्या दिवशी माघस्नान समाप्ती करावी. २७.२.२०२१ या दिवशी सूर्योदयकाली पौर्णिमा तिथी आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.२.२०२१)