संतांच्या वस्तूंचे अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
२१.२.२०२१ या दिवशी सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी (वय ८७ वर्षे) यांच्या डोक्यावरील केस आणि त्यांची जपमाळ यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट झाल्याचे लक्षात आले, उदा. एवढ्या उतार वयातही त्यांचे केस लांब आणि काळे असणे, तसेच त्यांच्या जपमाळेला सुगंध येणे, हातात जपमाळ धरल्यावर ती वजनाला हलकी जाणवणे इत्यादी. पू. लोटलीकरआजी यांच्या डोक्यावरील केस आणि त्यांची जपमाळ यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १२.२.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांचा संक्षिप्त परिचय
पू. आजी मागील २५ वर्षांपासून साधना करत आहेत. लहानपणापासून आणि नंतर वैवाहिक जीवन जगतांना त्यांना पुष्कळ कष्ट सहन करावे लागले; पण सहनशील वृत्तीने त्यांनी प्राप्त परिस्थितीला धैर्याने तोंड दिले आहे. पहिल्यापासून त्यांची देवावर श्रद्धा आहे आणि जीवनातील खडतर प्रसंगांना तोंड देतांना त्यांची ही श्रद्धा आणखी दृढ झाली.
पू. आजींनी कष्ट करत आणि श्रद्धेची कास धरत मुले, नातवंडे अन् पतवंडे यांच्यामध्ये संस्कारांचे बीज रोवून त्यांना आदर्श असे घडवले आणि सर्व कर्तव्ये भगवंतावर श्रद्धा ठेवून पार पाडली. १६.६.२०१९ या दिवशी त्यांना सनातनच्या ९९ व्या संत म्हणून घोषित करण्यात आले.
२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत पुढील घटकांची यू.ए.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंदवण्यात आली.
२ अ. पू. लोटलीकरआजी यांच्या डोक्यावरील केस : वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांचे केस काळे आणि लांब आहेत. पू. लोटलीकरआजी या रुग्णाईत असतांना सातत्याने झोपून असल्यामुळे त्यांचे लांब केस कापावे लागले. त्यांच्या कापलेल्या केसांची निरीक्षणे नोंदवण्यात आली.
२ आ. पू. लोटलीकरआजी यांची जपमाळ : ही पू. आजींनी २५ वर्षांहून अधिक काळ उपयोगात आणलेली जपमाळ आहे.
३. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – पू. लोटलीकरआजी यांच्या डोक्यावरील केस आणि त्यांची जपमाळ यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे
४. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
४ अ. पू. लोटलीकरआजी यांच्या डोक्यावरील केसांमध्ये पुष्कळ चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) असणे : संतांमध्ये पुष्कळ चैतन्य असते. त्यांच्यातील चैतन्याचा परिणाम त्यांचा देह, त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, त्यांची खोली (निवासस्थान) आणि त्यांच्या खोलीतील वस्तू यांवर होतो. संतांच्या ब्रह्मरंध्रातून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. पू. लोटलीकरआजी या संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. त्यांच्यातील चैतन्याच्या प्रभावामुळे त्यांच्या डोक्यावरील केसांमध्ये (७.४८ मीटर) पुष्कळ सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असल्याचे चाचणीतून दिसून आले.
४ आ. पू. लोटलीकरआजींनी केलेल्या भावपूर्ण नामजपामुळे त्यांच्या जपमाळेवर भगवंताच्या नामाचा संस्कार होऊन तिच्यामध्ये (जपमाळेमध्ये) देवत्व निर्माण होणे : पू. आजींनी २५ वर्षांपासून अधिक काळ उपयोगात आणलेल्या जपमाळेवर भगवंताच्या नामाचा संस्कार झाल्याने तिच्यामध्ये देवत्व निर्माण झाले.
पू. आजींची अखंड नामसाधना आणि त्यांचा चैतन्यमय हस्तस्पर्श यामुळे जपमाळेच्या सात्त्विकतेत पुष्कळ भर पडली. पू. आजींच्या जपमाळेमध्ये पुष्कळ (७.१० मीटर) सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले.
४ इ. पू. लोटलीकरआजी यांच्या डोक्यावरील केस आणि त्यांची जपमाळ यांमध्ये झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट अन् त्यांमागील अध्यात्मशास्त्र
– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
पू. लोटलीकरआजी यांनी संसारात राहून केलेली खडतर साधना, त्यांचे भगवंताशी असलेले अखंड नामानुसंधान आणि त्यांची गुरूंवरील अपार श्रद्धा यांमुळे त्या जीवनमुक्त झाल्या. त्यांच्या देहात झालेले दैवी पालट आणि त्यांच्या जपमाळेत निर्माण झालेले चैतन्य आदी गोष्टी जणू त्यांच्या तप:श्चर्येच्या साक्षी आहेत.
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.५.२०२०)
ई-मेल : [email protected]
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |