१. दळणवळण बंदीच्या काळात दैनिक सनातन प्रभातची छपाई बंद झाल्यावर पू. गुरुनाथ दाभोलकर यांनी संगणकावर दैनिक सनातन प्रभात कसे वाचावे, याविषयी शिकून घेणे आणि त्यातील सर्व बारकावे शिकून घेतल्याने ते दैनिक सनातन प्रभात वाचण्यात स्वयंपूर्ण होणे
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शासनाने दळणवळण बंदी घोषित केली. त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले. त्यातच दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीची छपाई बंद झाली. केवळ संकेतस्थळावर दैनिक सनातन प्रभातची पीडीएफ् अपलोड करण्यात येत होती. प्रत्येकालाच हाती दैनिक सनातन प्रभात घेऊन ते वाचण्याची सवय असल्याने दैनिक सनातन प्रभातची छपाई बंद झाल्यावर ते कसे वाचावे ?, असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला.
ज्यांना संगणकाची हाताळणी जमते, ते संगणकावर किंवा भ्रमणभाषवर दैनिक सनातन प्रभातची पीडीएफ् वाचायचे; पण ज्यांना तांत्रिकदृष्ट्या हाताळणी येत नाही, त्यांच्यासाठी दैनिक सनातन प्रभात वाचणे अवघड झाले. असे असतांनाही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेले एक उदाहरण म्हणजे सनातनचे पू. गुरुनाथ दाभोलकरकाका (वय ८० वर्षे) ! पू. काकांनी याआधी कधीही संगणक हाताळला नव्हता. त्यामुळे त्यावर दैनिक सनातन प्रभात वाचणे त्यांच्यासाठी कठीण होते; पण त्यांच्यात तीव्र तळमळ असल्याने त्यांनी या अडचणीवर सहजतेने मात केली.
संगणक हाताळणी येत नसल्याने प्रारंभी पू. काका अन्य साधकांच्या साहाय्याने दैनिक सनातन प्रभातचे वाचन करायचे. ते साधकांना संगणक चालू आणि बंद करायला सांगायचे. काही दिवसांनी त्यांनी संगणक चालू-बंद करणे स्वतःहून शिकून घेतले. त्यानंतर त्यांनी दैनिक सनातन प्रभात कुठल्या मार्गिकेवर संरक्षित केलेले असते, ते साधकांकडून समजून घेतले. त्यामुळे ते दैनिक सनातन प्रभात वाचनाच्या संदर्भातही स्वयंपूर्ण झाले.
२. दैनिक सनातन प्रभात वाचून झाल्यावर टंकलेखनाचा सराव करणे
प्रथम ते दैनिक सनातन प्रभातचे वाचन पूर्ण झाल्यावर खोलीत जायचे. काही दिवसांनी त्यांनी हळूहळू टंकलेखन शिकण्यास प्रारंभ केला. तेव्हाही त्यांची तळमळ शिकण्यासारखी होती. कोणते बटन दाबले की, कोणते अक्षर उमटते ?, हा भाग पू. काकांनी लवकर आत्मसात केला. त्यांनी प्रतिदिन काही घंटे वेळ देऊन टंकलेखनाची गती वाढवली. ते प्रथम काही शब्द, मग वाक्ये आणि त्यानंतर मोठे परिच्छेद, अशा स्वरूपात टंकलेखन करत होते. त्यांनी संगणक हाताळणी आणि टंकलेखन यांसाठी कराव्या लागणार्या कृती लिहून घेतल्या अन् त्याप्रमाणे प्रतिदिन कृती केली.
३. प्रार्थना
दळणवळण बंदीच्या काळात संगणक हाताळणी आणि टंकलेखन शिकणे यांविषयीचे पू. दाभोलकरकाकांचे प्रयत्न आम्हा सर्वच साधकांना शिकण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. पू. दाभोलकरकाकांची प्रत्येक कृती आणि बोलणे यांतून नेहमीच शिकायला मिळते. मी त्यांच्या सत्संगाचा लाभ करून घेण्यास न्यून पडते. त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ दे, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१०.२.२०२१)