प्रत्येकाने मातृशक्तीला जागृत केल्यास देश प्रगती करेल ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापिठाचा दीक्षांत समारोह

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – आपल्या देशात कुमारी पूजा केली जाते. बंगालमध्ये, तर सुनेलाही बहुमाता म्हटले जाते. ही भारताची परंपरा आहे. प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा यांचे रूप असून मुलींमध्ये सेवाभाव, वात्सल्य, त्याग आणि समर्पण भाव निसर्गदत्त असतो. त्यामुळे प्रत्येकाने मातृशक्तीला जागृत केल्यास आपल्याला सर्व क्षेत्रात सफलता मिळेल. त्यातून समाज आणि देश प्रगती करेल, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. १७ फेब्रुवारी या दिवशी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस्.एन्.डी.टी.) महिला विद्यापिठाच्या ७० व्या वार्षिक दीक्षांत समारोह सोहळ्यात मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानव्यशास्त्र, आंतरशाखीय अध्ययन या शाखांमधील १६ सहस्र ४८३ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका आणि आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. या वेळी ७३ सुवर्णपदके, १ रौप्यपदके आणि २१८ पारितोषिके प्रदान करण्यात आली. या समारंभाला भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर, विद्यापिठाचे कुलगुरु शशिकला वंजारी, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ‘‘प्रत्येक क्षेत्रात महिला स्वत:चा ठसा उमटवत आहेत. कुलपती या नात्याने मी उपस्थित असलेल्या प्रत्येक दीक्षांत समारोहात ५ सुवर्णपदके मुले, तर ५० सुवर्णपदके मुली पटकावतात. त्यामुळे नवा भारत मातृशक्तीचा असेल. शिक्षण केवळ अर्थार्जनासाठी न रहाता ते मूल्यांवर आधारित असावे. स्नातकांनी डोळ्यांपुढे उच्च ध्येय ठेवून तसेच नीतीमूल्ये, सदाचार, त्याग, सेवाभाव आणि सदाचार यांचा अंगिकार करून वाटचाल केल्यास वैयक्तिक उत्कर्षासह राष्ट्राला उत्कर्ष साधला जाईल.’’