संत तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवरायांचे वैभव नाकारत असतांनाच त्यांना पारमार्थिक उपदेशही करणे

१६.२.२०२१ या दिवशी संत तुकाराम महाराज यांची जयंती आहे. यानिमित्ताने…

संत तुकाराम महाराज यांची कीर्तने ऐकून आदर वाढल्यामुळे छत्रपती शिवरायांनी त्यांच्याकडे सत्कारार्थ दिवट्या, छत्री आणि धन पाठवले. तुकोबांच्या उत्तरार्धाच्या शेवटच्या ३-४ वर्षांत शिवरायांना कीर्तन ऐकण्याचा योग आला असावा. या सत्काराचा आणि धनाचा त्यांनी स्वीकार केला नाही. ते परत करतांना त्यांनी छत्रपती शिवरायांना ९ अभंग पाठवले. त्यात काही विठ्ठलाला आणि काही शिवबांना उद्देेशून आहेत. आयुष्याच्या अखेरच्या काळात वैभवात रहाण्याची संधी तुकोबांकडे आपण होऊन आली होती. ती त्यांनी नाकारली.

भक्ती आणि वैराग्य हा तुकोबारायांचा स्थायीभाव असल्याने त्याला अनुरूपच उत्तर त्यांनी छत्रपती शिवरायांना पाठवले. त्यांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये (१८८६ ते १८९०) त्यांनी शिवरायांना समर्थ रामदासांकडे जाण्याची विनंती केली आहे. ‘श्री रामदास हे भूषण असून तू त्यांच्या ठिकाणी मन घाल. मन चळू देऊ नकोस. वृत्ती चाळवलीस, तर रामदासांचे कार्य कसे घडेल ?’, असे ते म्हणतात. तसेच संपूर्ण विश्‍व विठ्ठलमय आहे आणि विठ्ठलातच तुम्हीही आहात’, असे तुकोबा लिहितात.’

(संदर्भ : मासिक ‘श्री गजानन आशिष’, मार्च २०१७)