पणजी येथील कार्निव्हलमध्ये सामाजिक अंतर पाळणे आणि मास्क घालणे या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन !

पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – पणजी शहरात १३ फेब्रुवारी या दिवशी काढण्यात आलेल्या कार्निव्हल मिरवणुकीत सामाजिक अंतर पाळणे आणि मास्क घालणे या कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले. दळणवळण बंदी उठल्यानंतर कार्निव्हल मिरवणूक हा राज्यातील पहिलाच शासन पुरस्कृत सार्वजनिक पर्यटन महोत्सव आहे. ‘कार्निव्हल मिरवणुकीत कोरोना महामारीच्या नियमांचे पालन केले जाणार आहे’, अशी पणजी महानगरपालिकेने केलेली घोषणाही हास्यास्पद ठरली.

कार्निव्हल मिरवणुकीला ‘किंग मोमो’च्या चित्ररथाने प्रारंभ झाला. या चित्ररथाद्वारे कोरोना लस घेण्याचे महत्त्व प्रदर्शित करण्यात आले होते. या ‘किंग मोमो’ असलेल्या चित्ररथासमवेत छायाचित्र घेण्यासाठी शेकडो लोक एकत्र आले. या वेळी सामाजिक अंतर पाळले गेले नाही, तरीही तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी नियमांचे पालन होण्यासाठी कोणतीच कृती केली नाही. मिरवणुकीत सामाजिक अंतर पाळण्यात येत नव्हते, तर फार अल्प जणांनी मास्क घातले होते. नियमांचे उल्लंघन केलेल्या काही पर्यटकांशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी एक वर्षाच्या आपल्या मुलासह (मास्क न घातलेल्या ) मिरवणूक पहाण्यासाठी आलेल्या जम्मू येथील पर्यटक मंजू ठाकूर म्हणाल्या, ‘‘मास्क घातल्याने खूप गरमी होते. मास्क घातला नाही; म्हणून काहीच होणार नाही, याचा मला आत्मविश्‍वास आहे.’’ सांतीनेज येथील शशी बाला म्हणाल्या, ‘‘आता लोकांना कोरोनाची भीती वाटत नाही.’’ (लोकांची अशी मानसिकता आहे, तर अशा लोकांना कोरोना लस विनामूल्य कशाला द्यायची  ? अशा व्यक्तींची काळी सूची बनवून या सूचीतील लोक कोरोना झाला म्हणून उपचारांसाठी आले, तर शुल्क लावून उपचार करणेच योग्य ठरेल ! –  संपादक)

मिरवणुकीतील चांगला भाग म्हणजे मिरवणुकीत ‘धूम्रपान करू नये’, ‘रस्ता सुरक्षा’, ‘पर्यावरणाचे रक्षण करणे’ आणि ‘स्तन कर्करोग टाळणे’ आदी सामाजिक संदेश देणारे चित्ररथही सहभागी झाले होते. राज्यात सध्या मोले येथील प्रकल्पाला विरोध दर्शवला जात आहे. याचेही पडसाद मिरवणुकीत उमटले. कार्निव्हल मिरवणुकीत झाडांचे महत्त्व दर्शवणारा आणि अप्रत्यक्षपणे मोले येथील प्रकल्पाला विरोध दर्शवणारा एक चित्ररथही सहभागी झाला होता. विकास प्रकल्प राबवतांना वनसंपदेचे रक्षण करण्याचे महत्त्व दर्शवणाराही एक चित्ररथ मिरवणुकीत सहभागी

झाला होता.