|
जेजुरी – येथील संस्थानाच्या वतीने जेजुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते; पण १२ फेब्रुवारी या दिवशी पहाटे अचानक भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोचले. त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानचे कर्मचारी यांच्यात झटापट झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आणि ते कार्यकर्त्यांसह निघून गेले. शरद पवार यांनी या पुतळ्याचे उद्घाटन करू नये, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, अखंड भारताचे दैवत अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समुदायासाठी मोठे काम केले आहे. महाराष्ट्रातील आमच्यासारख्या अनेक युवामित्रांचे म्हणणे होते की, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन होणे हे अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे आहे. शरद पवार यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावतांना विचार करावा; कारण त्यांच्या आणि अहिल्याबाई यांच्या विचारात फार तफावत आहे. आमचा पुतळा अनावरणाला विरोध नाही; मात्र भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नयेत. शरद पवार यांना माझे आव्हान आहे की, तुम्ही या पुतळ्याचे उद्घाटन करू नये.
पडळकर अन् त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंद केला आहे. पुतळ्याचे उद्घाटन झाल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.