गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी ४.७.२०२० या दिवशी संध्याकाळी श्री दुर्गादेवीचा नामजप करतांना मला सुचलेल्या सूत्रांविषयी येथे दिले आहे.
१. कोरोना वैश्विक महामारीमुळे विश्वभरातील प्रत्येक व्यक्ती त्रस्त असून त्याचा संसर्ग होऊ नये; म्हणून सॅनिटायझर लावत असणे
सध्या कोरोना जागतिक महामारीमुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला या विषाणूची भीती आहे. करोडो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. लक्षावधी लोक मृत्यूमुखीही पडले आहेत. लोक शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने व्यक्तींचा संपर्क टाळणे, कुठेही गेल्यावर आणि आल्यावर हात सॅनिटायझरने निर्जंतुक करणे, हात-पाय धुणे, विविध औषधे, घरगुती उपाय इत्यादी करण्याच्या नादात प्रत्येक जण आहे. स्वतःला या विषाणूचा संसर्ग होऊ नये, तसेच यापासून आपला बचाव व्हावा, याची काळजी प्रत्येक जण घेत आहे.
२. मनाला होणार्या संसर्गाची कुणाला जाणीव नसणे
प्रत्येक जण स्वतःच्या देहाची, म्हणजे शरिराची काळजी घेत आहे. हे जर मनाविषयी झाले, तर काय होईल ? मनावर आघात करणारा प्रत्येक वाईट विचार हा विषाणूच आहे. असे अनेक विषाणू प्रतिदिन मानवी मनाला पोखरून काढत आहेत. सध्या वातावरणात असे अनेक रज-तमाचे विषाणू आहेत. बाहेरील रज-तम वातावरणामुळे मनालाही संसर्ग होऊ शकतो. मन दूषित होऊ शकते. असे प्रतिदिन आपल्या विषयी घडत आहे; परंतु मनुष्याला त्याची जाणीव नाही.
३. शरिरासाठी सॅनिटायझर वापरणे; पण मनासाठी काय ?
कोरोनामुळे मृत्यू येईल, याची मानवाला भीती वाटते; पण तो मनाला झालेल्या संसर्गासाठी घाबरतो का ? मनाला विषाणूंचा संसर्ग होईल. मनालाही आजार झाल्यास मानवाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे कुणाला वाटते का ? प्रत्येकाने आपल्या मनाच्या विषयीही असा विचार केला पाहिजे. हाताला सॅनिटायझर लावता येईल, औषधोपचार करता येईल; पण मनाचे काय ? मनाच्या सॅनिटायझरचा शोध कोण लावणार ?
४. पूर्ण विश्वातील लोकांसाठी सॅनिटायझर शोधणारे विश्वगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !
४ अ. मनाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचा शोध लावणे : मला त्याच वेळी उत्तर सुचले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मनाच्या सॅनिटायझरचा शोध कित्येक वर्षे आधीच लावून ठेवला आहे. त्यांनी मनासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आधीच शोधून ठेवली आहे आणि साधकांकडून राबवूनही घेतली आहे. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने मनाचे निर्जंतुकीकरण होऊन मन शुद्ध होणार आहे. मनाला कुठून संसर्ग झाला; म्हणजे वाईट विचार, स्वभावदोष, नकारात्मक विचार, निराशा यांनी ते ग्रासले, तरी ही प्रकिया राबवून, म्हणजे स्वयंसूचना देऊन तसेच नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भाव, भक्ती यांसारखी गुरुकृपायोगानुसार आध्यात्मिक साधना करून प्रत्येक जण या संसर्गापासून वाचू शकतो.
४ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, म्हणजे जन्म-मत्यूच्या फेर्यांतून सोडवणारे सॅनिटायझर : या मनावर अनेक जन्मांपासूनचे संस्कार आहेत, तसेच सध्याच्या काळात मनावर क्षणोक्षणी आघात होत आहेत. मन अनेक दोषांनी संसर्गित होत आहे. आपल्या सभोवती असलेल्या व्यक्तींचा संसर्ग (तो वाईट वागतो, मग मीही तसे वागले, तर काय होते ? ही वृत्ती) मनाला होत आहे. परात्पर गुरुदेवांनी दिलेले हे सॅनिटायझर या जन्मासाठीच नसून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटण्यासाठी आहे. त्यांनी हे विनामूल्य; परंतु अनमोल सॅनिटायझर दिले आहे. त्याचा सर्वांनी लाभ करून घेऊन या सर्वच प्रकारच्या विषाणूंपासून स्वतःची सुटका करून घ्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
– सौ. कविता बेलसरे, पुणे (८.७.२०२०)
|