पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज आणि त्यांचे कुटुंबीय यांनी रामनाथी आश्रमाला भेट दिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी साधलेला संवाद !

निवळी (ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पू. सखाराम बांद्रे महाराज सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या समवेत सावर्डे (ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथे रहाणारे त्यांचे भाऊ ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिवराम बांद्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. वनिता शिवराम बांद्रे हे दोघेही आले होते. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली.

या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रकृतीविषयी, तसेच ‘प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते’, या संदर्भात पू. बांद्रे महाराज यांनी सांगितलेली उदाहरणे पुढे दिली आहेत.

(पू. सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला. – संकलक)


पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज

आज १४.८.२०२२ (श्रावण कृष्ण तृतीया) या दिवशी पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

१. पू. सखाराम बांद्रे महाराज यांनी ‘प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते’, याविषयी सांगितलेली उदाहरणे

१ अ. कालीमातेचे अनन्य भक्त असलेले श्री रामकृष्ण परमहंस लाखो भक्तांना बरे करत असूनही त्यांनी स्वतःच्या शारीरिक त्रासाकडे प्रारब्ध म्हणून पहाणे आणि ‘प्रारब्ध भोगून संपवावे लागते’, असे स्वामी विवेकानंद यांना सांगणे

पू. सखाराम बांद्रे महाराज : मी तुम्हाला याविषयी एक कथा सांगतो, ‘कोलकाता (बंगाल) येथे कालीमातेचे मंदिर आहे. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. ‘रामकृष्ण परमहंस हाताने स्पर्श करून लाखो भक्तांना त्यांच्या त्रासांतून मुक्त करतात’, हे स्वामी विवेकानंद यांनी पाहिले होते. रामकृष्ण परमहंसांना एक तुंबा आला होता आणि तो फुटून त्यातून पू येत होता. (तुंबा म्हणजे गाठ किंवा फोड. तेथे जखम नसते; पण कुठल्यातरी आजारामुळे शरिरावर एक गाठ येते. ग्रामीण भाषेत त्याला ‘तुंबा’ असे म्हणतात.) कितीतरी दिवस स्वामी विवेकानंद प्रतिदिन तो फोड धुऊन स्वच्छ करायचे. एक दिवस ते रामकृष्ण परमहंस यांना म्हणाले, ‘‘बाबा, तुम्ही एवढ्या लाखो भक्तांना बरे करता. तुम्हाला प्रत्यक्ष कालीमाता प्रसन्न आहे, तर तुम्ही तिला सांगा ना की, ‘हा फोड जाऊ दे (बरा होऊ दे) !’’ तेव्हा रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले, ‘‘असे बोलू नकोस. हे माझे प्रारब्ध आहे. ते मला भोगू दे. नाहीतर पुन्हा दुसर्‍या जन्मात मला ते भोगावे लागेल. ठाऊक आहे का तुला ?’’

‘या गोष्टीतून काय बोध घ्यायचा ?’, तर प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते.

१ आ. प्रभु श्रीराम, राजा हरिश्चंद्र, संत गोरा कुंभार इत्यादींची उदाहरणे देऊन ‘अवतार किंवा संत यांनाही त्यांचे प्रारब्धभोग भोगूनच संपवावे लागले’, असे सांगून पू. बांद्रे महाराज यांनी देवाला ‘मी जे कार्य करीन, त्याला यश दे’, असे सांगणे : राजा दशरथाचा मुलगा प्रभु श्रीराम हा श्रीविष्णूचा सातवा अवतार असूनही त्याला दुःख भोगावे लागले. सत्य आणि धर्म यांना धरून चालणार्‍या राजा हरिश्चंद्राला त्याची बायका-पोरे विकावी लागली. कृष्णाची भक्ती केली; म्हणून संत मीराबाईला विष प्यावे लागले. माती मळता मळता गोरा कुंभाराने (संत गोरा कुंभार यांनी) स्वतःचेच बाळ मातीमध्ये तुडवले. भक्त चोखोबा (संत चोखामेळा) भिंत पडून त्या भिंतीखाली गाडले गेले. त्यामुळे मी देवाला विचारतो, ‘तू कुणाचे भले केलेस रे विठ्ठला ? मी जेथे हात लावीन ना, तेथे चांगले कर.’ (मी इतरांसाठी जे कार्य करीन, त्याला यश दे.)

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. सखाराम बांद्रे महाराज यांच्या भेटीतील एक भावक्षण (मार्च २०२१)

२. पू. बांद्रे महाराज यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘तुम्ही श्रीरामच आहात, तुम्ही म्हातारे झाला नसून म्हातारे झाल्याचे दिसतही नाही’, असे सांगणे

पू. बांद्रे महाराज (परात्पर गुरु डॉक्टरांना) : मी खरे सांगतो. तुम्ही श्रीरामच आहात ! तुम्ही म्हातारे (म्हणजे ९० – १०० वर्षांचे) झाला नाहीत. तुम्ही म्हातारे झाल्याचे दिसता का ? मी ७१ वर्षांचा आहे आणि तुम्ही ७८ वर्षांचे आहात ! तुम्ही माझ्यापेक्षा ७ च वर्षांनी मोठे आहात. मला तुम्ही एकदम ताजेतवाने (फ्रेश) वाटता, तरतरीत वाटता. मला तुम्ही ‘अधिकाधिक ५५ ते ६० वर्षांच्या मधले दिसता !

३. पू. बांद्रे महाराज यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांची प्रकृती चांगली राहू दे’, असा आशीर्वाद देणे

पू. बांद्रे महाराज : हे (परात्पर गुरु डॉ. आठवले) इकडे गोव्यामध्ये आले. ते २० वर्षांपेक्षा अधिक काळ साधनेचा प्रचार करत आहेत. त्यांचे पाय धुऊन पाणी प्यायला हवे !

परात्पर गुरु डॉ. आठवले : यांचे (पू. बांद्रे महाराज यांचे) माझ्यावर अधिक प्रेम आहे. माझ्यावर असे प्रेम कुणी केले नाही.

पू. बांद्रे महाराज : ईश्वराला विचारायचे आहे, ‘हे (प्रकृतीविषयीचे) तुमचे काम होईल का ?’(परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लवकर बरे वाटेल का ?) ईश्वराला काय कठीण आहे ?

श्री. शिवराम बांद्रे : मी पू. महाराजांना (पू. बांद्रे महाराज यांना) सारखे म्हणतो, ‘‘माझे राहिलेले आयुष्य गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) चरणी समर्पित होऊ दे.’’

पू. बांद्रे महाराज : काळजी करू नका ! ‘यांची (परात्पर गुरु डॉक्टरांची) प्रकृती चांगली राहू दे’, असा आम्ही आशीर्वाद देत आहोत !