१. सर्वसामान्य माणसाची वृत्ती आणि कृती
१ अ. वृत्ती
१ अ १. मायेतील सुख : ‘जगात अर्धा आनंद बाईकडून मिळतो. अर्धा आनंद खाणे-पिणे, वस्त्र, अलंकार, निवासस्थान यांमुळे मिळतो. हे मिळवण्यासाठी जगात पुरुषांची पळापळ चालू आहे.’
१ अ २. मनुष्य मुलांच्या मायेत अडकणे : ‘खेकडे सहस्रो पिलांना जन्म देतात. नदीला पूर आल्यावर सर्व पिल्ले वाहून जातात. आई आणि पिल्ले यांची पुन्हा कधीच भेट होत नाही. सर्व प्राणी आपली पिल्ले सक्षम झाली की, मुलांना सोडून देतात आणि त्यांना विसरतात. माणसे मात्र चार मुलांचे बाप झाले, तरी कवटाळून रहातात. आई ‘माझा बाबा, माझा बाबा’, करत रहाते. अशी मनुष्याची रीत आहे.
१ अ ३. एकाच वृत्तीच्या माणसांची जोडी असते ! : ‘बुवाकडे बुवा जाणार, उतरणार आणि रहाणार. चोराकडे चोर उतरणार, पुढार्याकडे पुढारी उतरणार, लबाडाकडे लबाड उतरणार. एकाच वृत्तीच्या माणसांची जोडी असते.’
१ अ ४. मनुष्याची भूक आणि कामवासना न शमल्यास अनर्थ होणे अन् या शमवण्यासाठी माणूस सकाळपासून रात्रीपर्यंत धावत असणे : माणसाचे शरीर आणि रानावनातील पशूपक्षी यांच्या देहात देवाने २ मोठ्या भयंकर स्वरूपाच्या आगी पेटवून ठेवल्या आहेत. पहिली आग भूकेची आणि दुसरी कामवासनेची ! अशा २ आगी धडधडा पेट घेतात. तेव्हा माणूस वेडा होतो. या २ भुका शमल्या नाहीत, तर अनर्थ होऊ शकतो. या २ भुका भागवण्यासाठी माणूस सकाळपासून रात्रीपर्यंत धावत आहे.’
१ अ ५. माणसाचा दिवस संपत्तीची हाव किंवा कुटुंबाचे पालन-पोषण यातच संपून जाणे आणि रात्र झोपेत जाणे अन् यामुळे संसारात रमतांना ‘मृत्यू धाड टाकणार आहे’, याचीही त्याला आठवण नसणे : पुढे परमार्थाकडे न जाणार्या, पुण्यसंचय न करणार्या माणसाचे आयुष्य कसे फुकट जाते, ते पहा ! भागवतात शुकमुनी परीक्षित राजाला म्हणतात, ‘माणसाचे आयुष्य रात्री झोपेत जाते किंवा स्त्री सहवासात जाते. दिवसा संपत्तीची हाव किंवा कुटुंबाचे पालन-पोषण यातच संपून जाते. ‘तो संसारात एवढा रमतो की, पुढे मृत्यू आपल्यावर धाड टाकणार आहे’, याची त्याला आठवण रहात नाही. ‘जो आपल्याला पोसतो किंवा सांभाळतो, त्यांच्यापैकी कुणीही आपल्या समवेत येणार नाही आणि नंतर आठवणही काढणार नाही’, याची त्याला कल्पना नसते.’
१ अ ६. स्वार्थासाठी माणूस माणुसकी विसरत चालला असून सगळीकडे अनाचार आणि भ्रष्टाचार चालू असणे अन् त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनच उद्ध्वस्त होत असणे : देव कुणाला त्रास देत नाही. जगामध्ये माणूसच माणसाला खातो आणि माणूसच माणसाला त्रास देतो. कामापोटी आणि स्वार्थासाठी माणूसच माणुसकी विसरत चालला आहे. त्यामुळे जगात पाप्यांचा सुळसुळाट झाला आहे. पापी, लबाड आणि लुच्चे मोठ्या पदांवर (हुद्यांवर) बसलेले आहेत. प्रशासन प्रतिदिन महागाई करून जनतेवर कर लावत आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवनच उद्ध्वस्त होत आहे. राजकारण्यांना अवदसा आली आहे. नीती आणि न्याय राहिलेला नाही. सगळीकडे अनाचार आणि भ्रष्टाचार चालू आहे. ‘देवा, तू आता अवतार घे आणि या पाप्यांचा धरणीमातेला होणारा भार न्यून कर.’
१ अ ७. ‘अज्ञानामुळे चुकीचे निर्णय घेऊन संसाराची हानी होणे; म्हणून चुका काढणारे जग आपला गुरु आहे’, असे समजून दिवसेंदिवस सुधारत जावे, हेच शहाणपण असणे : माणसाचा स्वभाव कसा आहे, पहा ! ‘आपली चूक झाकून ठेवायची आणि दुसर्याची चूक सांगायची’, अशी मनुष्याची वृत्ती असते. ‘जो आपली चूक सांगतो, तो आपला गुरु आहे’, असे समजले पाहिजे; कारण तो आपल्याला सुधारायला साहाय्य करत असतो; पण आपण चूक सांगणार्यावर रागावतो. येथेच माणसाची चूक होते. त्यामुळे माणूस शहाणा न होता वेडाच रहातो. काहींच्या नाकावर भलताच राग असतो. माणसाच्या नाकावर राग असतो; म्हणून त्याला त्या प्रसंगातून शिकता येत नाही आणि ज्ञान होत नाही. चुका सुधारल्या नाहीत, तर आपण सुधारणार कसे ? आपण अज्ञानीच राहू आणि अज्ञानामुळे आपण चुकीचे निर्णय घेऊन संसाराची हानी होईल. त्यामुळे चुका सांगणार्यांना गुरुस्थानी मानून स्वतःला दिवसेंदिवस सुधारावे, हेच शहाणपणाचे आहे.’
१ अ ८. कळी लावून देणारा मनुष्य विष निर्माण करत असणे : ‘नारदमुनींची वीणा सामान्य नाही. ही वीणा घेऊन नारदमुनी देवाचे भजन करत तीन ताल, सप्तपाताळ, १४ भुवने आणि २१ स्वर्ग फिरायचे. नारद देव आणि दानव यांना मान्य होता. दैत्य आणि देव दोघेही त्यांना मान द्यायचे; मात्र ते कळी लावून द्यायचे. त्यातून चांगले निर्माण व्हायचे; परंतु आम्ही ज्या कळी लावतो, त्यातून विष निर्माण होते. आम्ही लावत असलेल्या कळी स्वतःची तुंबडी भरण्यासाठी असतात.’
१ अ ९. संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण
१ अ ९ अ. पैशांवर नाते अवलंबून असणे : ‘सर्वत्र मायेचा बाजार भरला आहे. ज्या भावाचा धंदा जोरात चालतो, त्याची बहीण ‘दादा, दादा’ करते. जिचा भाऊ गरीब असेल, त्याच्याकडे कुणी कुत्रासुद्धा फिरकत नाही.’
१ अ १०. कुजलेला कांदा पूर्ण गोणी नासवतो, तसे खोटारडी आणि पापी माणसे चांगल्या माणसांनाही बिघडवतात ! : ‘मला परोपकारी आणि उदार माणसे आवडतात. सत्याने अन् नीतीने चालणारी, धर्माप्रमाणे वागणारी पुण्यवंत भक्त माणसे मला हवी आहेत. ज्ञानी माणसे मला पाहिजेत. मला इथे खराब माणसे नकोेत. लबाड, लुच्चे, फसवे, बुडवे, खोटारडे, पापी माणसे नकोत. ‘असा ज्यांचा स्वभाव असेल, त्यांनी माझ्याकडे येऊ नये’, असे मला वाटते. ‘वाईट आणि स्वभावदोषांचे आवरण आलेली माणसे मला इथे नको आहेत’; कारण ती चांगल्या माणसांना नासवतात. एका कुजलेल्या कांद्यामुळे कांद्यांची चांगली गोणी खराब होते. सगळेच कुजतात. त्यामुळे बाजूला व्हा.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– पू. सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)