पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्याशी झालेली हृदयस्पर्शी भेट !

‘पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांना ईश्वराकडून ज्ञान मिळत असे. त्यांना मिळालेल्या ज्ञानाच्या वह्या वाचून माझ्या मनात त्यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली. माझी त्यांच्याशी भेट झाल्यानंतर काही मासांतच त्यांनी देहत्याग केला. माझी त्यांच्याशी झालेली ती भेट पहिली आणि अखेरची ठरली.


पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज

१. पू. बांद्रे महाराज रामनाथी आश्रमात आले असल्याचे समजल्यावर त्यांना भेटण्याची तळमळ वाढणे आणि त्यांना पाहिल्यावर ‘त्यांची प्रकाशमान दृष्टी आत्म्याला भिडली आहे’, असे जाणवणे

‘पू. बांद्रे महाराज रामनाथी आश्रमात आले आहेत’, असे मला समजल्यावर माझी त्यांना भेटण्याची तळमळ वाढली. माझ्या मनात ‘त्यांना मला भेटायला वेळ असेल का ?’, असा विचार असतांनाच ते मला भोजनकक्षात येतांना दिसले. ते पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि पांढरी टोपी (वारकरी घालतात तशी), या वेशात होते. त्यांच्या ओठांवर स्मितहास्य आणि डोळ्यांत प्रीती होती. त्यांची दृष्टी प्रकाशमान आणि दृश्याचा भेद करून आरपार, म्हणजे पारदर्शक अन् आत्म्याची शोध घेणारी होती. त्यांची दृष्टी माझ्या आत्म्याला भिडली आणि मी मनात म्हटले, ‘हेच ते पू. बांद्रे महाराज आहेत !’

पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे

२. पू. बांद्रे महाराज यांच्याशी झालेली हृदयस्पर्शी भेट आणि त्या वेळी त्यांच्यातील अहंशून्यतेचे घडलेले दर्शन !

२ अ. पू. बांद्रे महाराज यांनी साधिकेला ‘आई’ अशी भावपूर्ण हाक मारणे आणि साधिकेच्या पायाला हात लावून नमस्कार करणे : मी अल्पाहार घेण्यासाठी बसले असतांना दुरूनच त्यांना पाहून उभी राहिले. तोपर्यंत ते माझ्यापाशी पोचले. त्यांनी मला ‘आई’ अशी भावपूर्ण हाक मारली आणि त्यांनी माझ्या पायाला हात लावून ‘नमस्कार करतो’, असे म्हणत नमस्कार केला. मला हे अनपेक्षित असल्यामुळे मी भांबावले. ‘ते परात्पर गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) नमस्कार करत आहेत’, अशा विचाराने मी स्थिर राहिले.

२ आ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची शिकवण आचरणात आणणारे पू. बांद्रे महाराज ! : मी त्यांना म्हणाले, ‘‘बाबा, मी सामान्य साधक. तुम्ही संत आहात. मी तुम्हाला नमस्कार करणार होते. त्याआधी तुम्ही मला नमस्कार का केला ?’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येकाला नमस्कार करायला सांगितले आहे. त्यामुळे आपला अहंकार नष्ट होतो आणि आपल्यात नम्रता येते. प्रत्येकात (जिवात) भगवंत (देव) आहे.’’

३. या ज्ञानी आणि भक्तीयुक्त अंतःकरणाच्या कर्मयोग्याची भेट स्मरतांना आताही माझे मन आनंद, प्रीती आणि चैतन्य यांनी भरून आले आहे. या त्यांच्या कृपेची अनुभूती त्यांना भेटलेल्या बहुतांशी साधकांनी घेतली आहे.’

– गुरुचरणी शरणागत, सौ. शालिनी प्रकाश मराठे (आताच्या पू. (कै.) सौ. शालिनी मराठे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक