अरेरावी करणार्या मद्यपींवर नियंत्रण मिळवू न शकणारे स्थानिक प्रशासन !
सातारा, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील एका नगरसेवकाच्या समर्थकांनी मद्यप्राशन करून ठोसेघर (सातारा) येथील धबधबा परिसरात धिंगाणा घातला. तसेच धबधबा पहाण्यासाठी पर्यटकांकडून घेण्यात येणारे प्रवेश शुल्क देण्यास मद्यपींनी नकार दिला. २ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरातील एका नगरसेवकाचे समर्थक ठोसेघरचा धबधबा पहाण्यासाठी गेले होते. त्यातील काहींनी मद्यप्राशन केले होते. धबधबा प्रवेशद्वारावर संयुक्त वन व्यवस्थापन समिती कर्मचार्यांनी त्यांना प्रवेश शुल्क मागितले; मात्र त्यांनी ते देण्यास नकार दिला. या वेळी मद्यपींनी शहरातील प्रतिष्ठित नगरसेवक आणि नागरिक यांची नावे घेतली. तसेच ‘आम्ही त्यांचे समर्थक आहोत’, असे सांगितले. तसेच प्रवेशशुल्क देण्यास नकार देत कर्मचार्यांशी अरेरावी करण्यास प्रारंभ केला. प्रसंगावधान राखत कर्मचार्यांनी संयुक्त वन व्यस्थापन समितीच्या सदस्यांना पाचारण केले. त्यांनी घटनास्थळी येऊन नगरसेवकांच्या समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते सदस्यांनाही अरेरावी करतच होते. शेवटी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेताच मद्यपी शांत झाले.