अध्यात्मविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कोलंबो, श्रीलंका येथील ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’ या विषयावरील शोधप्रबंध सादर !
मुंबई – अलीकडच्या काळात समाजसेवेच्या क्षेत्रात अध्यात्म आणि धर्म यांविषयी संवेदनशील राहून त्यांचा समावेश करण्याकडे कल वाढत आहे. याचा अर्थ ‘समाजसेवक तसेच ते ज्यांची सेवा करतात, त्या व्यक्ती यांचा धर्म आणि आध्यात्मिक श्रद्धा यांविषयी संवेदनशील असणे’, असा आहे. मुळात अध्यात्म आणि समाजसेवा यांचा काय संबंध आहे ? समाजसेवा हे आध्यात्मिक उन्नती करण्याचे प्रभावी माध्यम आहे का ? महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’, या शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या माध्यमातून वरील विषयावर ऊहापोह केला. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले, तर सौ. ड्रगाना किस्लौस्की आणि श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. कोलंबो, श्रीलंका येथे ऑनलाईन संपन्न झालेल्या ८ व्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल सायन्स अॅण्ड ह्युमॅनिटी (आयसीएस्.एस्.एच् २०२१)’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत २९ जानेवारी २०२१ या दिवशी सौ. ड्रगाना किस्लौस्की बोलत होत्या. या परिषदेचे आयोजन ‘ग्लोबल अॅकेडॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट (गॅरी)’ या संस्थेने केले होते.
सौ. किस्लौस्की पुढे म्हणाल्या की,
१. अनेक समाजसेवकांच्या संदर्भात समाजसेवा ही त्यांची आध्यात्मिक साधनाही असते; मात्र अनेकांची ‘अध्यात्म’ या शब्दाची व्याख्या संदिग्ध असते. सोप्या भाषेत सांगायचे तर ‘मानवाची ईश्वराची अनुभूती घेण्यासाठीची धडपड म्हणजे अध्यात्म.’ ही अनुभूती एखाद्या उन्नत आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून घेतली जाते. मूलतः हे म्हणजे स्वतःची पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे जाऊन आत्मा, म्हणजेच प्रत्येकातील ईश्वराच्या अंशाची अनुभूती घेणे होय.
२. आजच्या काळात बहुतांश व्यक्ती केवळ स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार करतात. इतरांचा विचार करणारे विरळाच. त्यामुळे इतरांचा विचार करणे हे महानतेचे लक्षण आहे, विशेषतः जर समाजसेवा विनामूल्य केली जात असेल. इतरांचा विचार केल्यामुळे काही प्रमाणात आध्यात्मिक उन्नती होते; परंतु समाजसेवक, तसेच ते ज्यांची सेवा करतात, त्या व्यक्तींचीही जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होण्याच्या दृष्टीने समाजसेवेचे आध्यात्मिकीकरण कसे करू शकतो ?
३. सर्वप्रथम समाजसेवकाने हे समजून घेणे आवश्यक आहे की, लोकांच्या समस्यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारणे असतात, उदा. प्रारब्ध, अनिष्ट शक्ती, अतृप्त पूर्वजांचे सूक्ष्मदेह इत्यादी जेव्हा एखाद्या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, तेव्हा त्यावर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर साहाय्य देणे किंवा नामजपादी उपाय करणे आवश्यक असते. समाजसेवेच्या क्षेत्रात याचा अर्थ ‘जी समस्या असेल, त्यावर शारीरिक आणि मानसिक स्तराच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक उपाययोजनाही अनिवार्य आहे’, असा होतो.
४. वैयक्तिक स्तरावरही परिस्थिती आणि व्यक्ती यांच्या प्रती समाजसेवकाने आपली वृत्ती अन् वर्तन यांकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे; कारण आध्यात्मिकदृष्ट्या अनुचित विचार अन् कृती यांमुळे त्याने केलेले सर्व चांगले कार्य निष्फळ होऊ शकते, उदा. अहंकारामुळे आध्यात्मिक उन्नती कुंठित होऊ शकते किंवा अधोगती होऊ शकते, मानसिक स्तरावरील अत्यधिक गुंतवणुकीमुळे आसक्ती निर्माण होते. अपेक्षांमुळे दुःख आणि कर्तेपणा (पहा मी किती केले) पदरी पडतो अन् यांमुळे नव्याने देवाणघेवाण हिशोब निर्माण होतो.
५. मूलभूत आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण झालेल्या समस्या टाळणे, तसेच त्यांवर मात करण्याचा उपाय यांसाठी ज्या धर्मात आपला जन्म झाला असेल, त्यानुसार देवाचा नामजप करणे हा एक विनामूल्य आणि प्रभावी उपाय असल्याचे आमच्या संशोधनात निष्पन्न झाले आहे. हा उपाय समस्याग्रस्त व्यक्ती, तसेच समाजसेवक यांनीही करणे आवश्यक आहे. अंतिमतः आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य हेच खरे साहाय्य होय; कारण ते व्यक्तीला आपल्या अनिष्ट प्रारब्धाचे बळी होऊ न देता त्यावर मात करण्यास सक्षम बनवते, असे सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी समारोपात सांगितले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा ६६ वा शोधनिबंध होता. याआधी १५ राष्ट्रीय आणि ५० आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये विविध शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यापैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. |
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |