पर्यटनवृद्धीसाठी केलेल्या ‘इव्हेंट’च्या आयोजनात गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून विरोधकांनी शासनाला धारेवर धरले

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

पणजी, २९ जानेवारी (वार्ता.) – राज्य पर्यटन खात्याने देशविदेशात पर्यटनवृद्धीसाठी ‘इव्हेंट’चे आयोजन केले. या आयोजनात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या वेळी उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना विरोधकांनी धारेवर धरले.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले, ‘‘मागील ४ वर्षांत शासनाने ‘रोड शो’ आणि पर्यटनवृद्धीसंबंधी विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी एकूण ३३ कोटी ६८ लाख रुपये खर्च केले आहेत. पर्यटनवृद्धीसाठी ३३ कोटी रुपये अल्प आहेत, तर यासाठी अधिक निधीची आवश्यकता आहे.’’

विरोधकांच्या मते गतवर्षी कोरोना महामारीमुळे अनेक ‘इव्हेंट’ झालेले नसतांना ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनांनी ‘इव्हेंट’साठी दिलेले शासनाचे पैसे शासनाला परत केलेले नाहीत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदी असतांना ‘रोड शो’ आदी पर्यटनवृद्धी उपक्रमाचे ‘प्री ऑडीट’ करणार असल्याचे आश्‍वासन सभागृहाला दिले असतांना अशा ‘रोड शो’चे ‘प्री ऑडीट’ का केले नाही ? या चर्चेत सहभाग घेतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘रहित झालेल्या‘इव्हेंट’चे पैसे आयोजकांकडे राहिले आहेत आणि ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनांकडे नाहीत.’’ उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर पुढे म्हणाले, ‘‘इव्हेंट’चे आयोजन करणे आणि तो पुढे रहित करणे, यामध्ये काही गैर नाही.’’

कोरोना महामारीमुळे पर्यटन क्षेत्राची २ सहस्र ६२ कोटी रुपयांची हानी ! – गोवा पर्यटन विकास महामंडळ

कोरोना महामारीच्या काळात गोव्यात ९ लाख ७९ सहस्र पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आणि यामध्ये ७ सहस्र विदेशी पर्यटकांचा सहभाग आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने ‘के.पी.एम्.जी.’ या आस्थापनाच्या साहाय्याने पर्यटनाच्या गोव्यावर झालेल्या परिणामाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार कोरोना महामारीमुळे पर्यटन क्षेत्राची २ सहस्र ६२ कोटी रुपयांची हानी झाली आहे. २०२०-२१ या वर्षात पर्यटन क्षेत्राची एकूण ७ सहस्र २३९ कोटी रुपयांची हानी होणार आहे आणि १ लाख २२ सहस्र (५८ टक्के) लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागणार आहेत.