सिंघू सीमेवर स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष !

कथित शेतकर्‍यांकडून पोलिसांवर तलवारीने आक्रमण !

  • तलवारीने आक्रमण करणारे आंदोलक कधीतरी शेतकरी असू शकतील का ?
  • तलवारी, लाठीकाठ्या आदी साहित्य घेऊन आंदोलन करणारे आणि प्रसंगी पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आंदोलनकर्त्यांना वठणीवर आणण्याचा आदेश सरकार पोलिसांना का देत नाही ?

नवी देहली – येथील सिंघू सीमेवर २९ जानेवारीला दुपारी आंदोलनकर्ते शेतकरी आणि महामार्ग रिकामी करण्याची मागणी करणारे स्थानिक नागरिक यांच्यात झालेल्या संघर्षामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या संघर्षाच्या वेळी एका पोलीस अधिकार्‍यांवर शेतकर्‍यांकडून तलवारीने आक्रमण करण्यात आल्याने हा अधिकारी घायाळ झाला. पोलिसांनी आक्रमणकर्त्याला अटक केली आहे. प्रजासत्ताकिदिनाच्या हिंसाचारानंतर देहली आणि उत्तरप्रदेश राज्यांचे पोलीस देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी मोठ्या संख्येने येथे फौजफाटा आणला आहे.

स्थानिक नागरिकांनी आंदोलक शेतकर्‍यांच्या विरोधात आंदोलन करतांना ‘तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान’च्या घोषणा देत महामार्ग रिकामा करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंनी आंदोलन चालू असतांना अचानक वादाची ठिणगी पडली. वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक चालू झाली. आंदोलक हिंसक झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवत असताना आंदोलक शेतकर्‍यांनी पोलिसांवर आक्रमण केले.