कृषी मंडळ कार्यालयाला आज टाळे ठोकणार ! – बांदा सरपंचांची चेतावणी

बांदा विभागीय कृषी मंडळ कार्यालयासमोर २६ जानेवारीला ध्वजारोहण न केल्याचे प्रकरण

उजवीकडून सरपंच अक्रम खान

सावंतवाडी – तालुक्यातील येथील बांदा विभागीय कृषी मंडळ कार्यालयासमोर २६ जानेवारीला ध्वजारोहण करण्यात न आल्याने बांद्याचे सरपंच अक्रम खान यांनी कार्यालयात जाऊन कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांना याविषयी खडसावले; मात्र घाडगे सक्षम कारण देऊ न शकल्याने अक्रम खान यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे, तसेच २८ जानेवारी या दिवशी कार्यालयाला टाळे ठोकण्याची चेतावणी दिली आहे.

सरपंच अक्रम खान हे बांदा कृषी मंडळ कार्यालयामध्ये विचारणा करण्यास गेले असता बांदा मंडळ अधीकारी रूपाली पापडे या सुटीवर असल्याने पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांच्याकडे कार्यभार होता. या वेळी घाडगे यांनी मी २३ जानेवारी २०१९ या दिवशी ध्वज खराब झाल्याचे वरिष्ठांना लेखी कळवले होते, तसेच या वेळी  कार्यालयामध्ये पुरेसा कर्मचारीवर्ग नाही, अशी उत्तरे दिली. या वेळी घाडगे यांनी याला ते उत्तरदायी नसून सर्वस्वी वरिष्ठ उत्तरदायी असल्याचे सांगितले. वर्ष २०१९ पासून आतापर्यंत दोन वेळा २६ जानेवारी आणि  १५ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण केले नसल्याचे घाडगे यांनी मान्य केले. खान यांनी ध्वजारोहण करू नका, असे शासनाचे परिपत्रक आले होते का ?, असा प्रश्‍न उपस्थित केला असता घाडगे यांनी परिपत्रक आले नसल्याचे सांगितले. या वेळी सरपंच खान यांनी कृषी खात्याच्या मनमानी कारभाराविषयी  जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले.