अनुभूती देऊन साधकांना साधनेत घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. आश्रमात लावलेल्या सूचनांच्या पाट्या पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण येणे
रामनाथी आश्रमात साधकांसाठी सर्वत्र सूचनांच्या पट्ट्या किंवा पाट्या लावलेल्या आहेत, उदा. मुखप्रक्षालनपात्राजवळ हात धुण्यासाठी साबण किंवा हात पुसण्यासाठी टॉवेल ठेवलेल्या ठिकाणी पाट्या आहेत. कुठल्याही पाटीकडे बघितल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच आठवण येते. जणूकाही परात्पर गुरुदेवच मला ती सूचना सांगत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत, असे मला वाटते.
२. दायित्व असलेल्या साधकांनी चुका सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवलेच चुका सांगत आहेत, असे वाटणे
दायित्व असलेल्या साधकांनी माझ्या चुका सांगितल्या की, पूर्वी मला ताण यायचा; परंतु आता त्या चुका परात्पर गुरुदेवच मला सांगत आहेत, असे मला वाटते. त्या वेळी माझ्यावर गुरुकृपेचा वर्षाव होत आहे, असे वाटून तेथे मला गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते.
३. साधिकेच्या माध्यमातून सहजता आणि अंतर्मुखता हे गुण कसे आत्मसात करायचे ?, हे परात्पर गुरुदेव शिकवत असल्याचे जाणवणे
मी बेकरीमध्ये सेवा करत असतांना एक नवीन साधिका सेवेला आली होती. ती प्रथमच बेकरीत सेवेला आली होती. ती सांगितलेली सर्वच सेवा अगदी सहजतेने आणि अंतर्मुखतेने करायची. त्यामुळे आम्हाला ती साधिका नवीन असल्याचे जाणवले नाही. तेव्हा माझ्या मनात विचार आला, गुरुदेवांनी सर्व साधकांना हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी आधीच सिद्ध केलेले आहे. ती साधिका सेवा करत असतांना मला सतत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवायचे. गुरुदेवच तिच्या माध्यमातून सहजता आणि अंतर्मुखता हे गुण कसे आत्मसात करायचे ?, हे शिकवत आहेत, असे मला वाटायचे.
४. स्वतःकडून चुकीची कृती होत असल्यास परात्पर गुरुदेवांचेे अस्तित्व जाणवणे
माझ्याकडून चुकीची कृती होत असल्यास मला तेथे परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते. ते मी चुकत असल्याची जाणीव करून देऊन मला योग्य कृती करण्यास सांगत आहेत, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
५. प्रार्थना करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याऐवजी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्रार्थना होणे आणि तेव्हा परात्पर गुरुदेवांना निर्गुणातून अनुभवता आले असल्याचे जाणवणे
परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या एक दिवस आधीपासून माझ्या कडून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पुष्कळ प्रार्थना होत होत्या. त्या आधी असे कधीच झाले नव्हते. मी नेहमी गुरुदेवांनाच प्रार्थना करायचो. जन्मोत्सवाच्या दिवशीही मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाच पुष्कळ आर्ततेने प्रार्थना करत होतो. तेव्हा मी गुरुदेवांना विसरून गेलो कि काय ?, असा विचार माझ्या मनात आला. मला प्रार्थना करतांना गुरुदेवांचे अस्तित्व माझ्या भोवती जाणवले. गुरुतत्त्व एकच असल्यामुळे प्रार्थना कशीही आणि कुणालाही केली, तरी ती देवापर्यंत पोचणारच आहे. मला प्रार्थना करतांना गुरुदेवांऐवजी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्या, म्हणजेच मला गुरुदेवांनाच निर्गुणातून अनुभवता आले. गुरुदेवांचे निर्गुण तत्त्व अधिकच वाढत चालले आहे, याचीच ही अनुभूती असल्याचे माझ्या लक्षात आले.
६. आश्रमातील जिना चढतांना बाजूच्या लाकडी दांड्याला हात लावल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
मी आश्रमातील जिना चढतांना बाजूच्या लाकडी दांड्याला हात लावल्यानंतर मला गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते; कारण गुरुदेवांचा त्या दांड्याला स्पर्श झाला आहे. चराचरात त्यांचे अस्तित्व आहे. त्या लाकडी दांड्यातून चैतन्य आणि शक्ती प्रक्षेपित होत आहे, असे वाटते.
७. गुरुदेवांचे अस्तित्व चराचरात असून सर्व साधकांमध्येही ते असल्याचे जाणवणे
आतापर्यंत साधकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा पत्रे सिद्ध करतांना देवाने माझ्याकडून कविता करवून घेतल्या आहेत. एकदा माझ्या मनात विचार आला की, मी गुरुदेवांसाठी कधीच कविता केली नाही. त्यावर देव म्हणाला, गुरुदेवांचे अस्तित्व तर चराचरात आहे. सर्व साधकांमध्येही त्यांचे अस्तित्व आहे. साधकांसाठी तू कविता केलीस, म्हणजे तू गुरुदेवांसाठीच कविता केलीस. त्या वेळी मला या विचारातही गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले, म्हणजेच मला त्यांना निर्गुणातून अनुभवता आले.
८. साधकांना प्रत्येक गोष्टीतून शिकवण्याचा विचार केवळ परात्पर गुरु डॉ. आठवलेच करू शकतात, असे जाणवणे
आश्रमात शिबिर असते. या वेळी साधक अध्यात्मप्रसाराच्या उपक्रमांचे नियोजन करत होते. तेव्हा मला ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सिद्धता करत आहेत, असे वाटले. त्या वेळी मला तेथे गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले; कारण हिंदु राष्ट्राची संकल्पना त्यांचीच आहे आणि तेच सर्व साधकांच्या माध्यमातून सेवा करवून घेतात.
आतापर्यंत मी अनुभूती लिहून दिल्यानंतर मला ती अनुभूती आली, असे कर्तेपणाचे विचार माझ्या मनात यायचे; पण या वेळी चराचरात गुरुदेव आहेत, अशी अनुभूती आल्यामुळे त्यांच्याच कृपेमुळे मनात कर्तेपणाचे विचार आले नाहीत. ही अनुभूती त्यांनी मला शिकण्यासाठी दिली आहे, असे मला वाटते. साधकांना प्रत्येक गोष्टीतून शिकवण्याचा विचार केवळ परात्पर गुरुदेवच करू शकतात. असे परात्पर गुरु लाभल्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
गुरुदेव, तुम्हीच या अनुभूतीचे लिखाण निर्गुणातून केले आहे. असेच मला तुम्हाला सतत निर्गुणातून अनुभवता येऊन गुरुपादुकांशी लीन रहाता येऊ दे, अशी तुमच्या पावन चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.
– श्री. अपूर्व प्र. ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |