बालवयापासूनच नैतिकता शिकवणे आणि धर्मशिक्षण देणे किती अपरिहार्य आहे, हे अशा घटनांतून लक्षात येते !
संशयित युवकावर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार
कुडाळ – तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना आक्षेपार्ह कृत्य करतांना या महाविद्यालयातील एका शिक्षकाने रंगेहात पकडले. त्यानंतर शिक्षकाने या विद्यार्थ्याला पालकांना बोलावण्यास सांगितल्यावर त्याने भावाला भ्रमणभाष करून बोलावले. शाळेत आलेल्या विद्यार्थ्याच्या भावाने या प्रकाराविषयी कोणतीही चर्चा न करता शिक्षकाला मारहाण केली. ही घटना गंभीर असून या प्रकरणी युवकावर कारवाई न झाल्यास २६ जानेवारीला कुडाळ पोलीस ठाण्यासमोर ‘धरणे आंदोलन’ करणार असल्याची चेतावणी ‘शिक्षक भारती सिंधुदुर्ग’ या संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना एका निवेदनाद्वारे दिली आहे.
‘१९ जानेवारीला सकाळी ही घटना घडली. याविषयी रितसर लेखी तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात देऊनही युवकावर कारवाई झाली नाही. असे झाले, तर समाजात चुकीचा संदेश जाईल. शैक्षणिक क्षेत्रात दादागिरी करून भिती पसरवणार्या या घटनेचा ‘शिक्षक भारती संघटना’ तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. कायदा हातात घेणार्या या युवकाला तात्काळ अटक करण्यात यावी’, असे या निवेदनात म्हटले आहे.
याविषयी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्रीमती संध्या गावडे यांच्याकडे निवेदन दिले, तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचीही भेट घेऊन त्यांना याविषयी कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनीही पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.