सांगलीत ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची हत्या

आरोपीला फाशी देण्यासाठी गावकर्‍यांचा मोर्चा 

( प्रतिकात्मक चित्र )

बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) – २१ जानेवारीला येथील देववाडी या गावातील ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मारेकर्‍याने महिलेचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही हत्या गावातीलच २२ वर्षीय तरुणाने केली आहे. हा तरुण गावातील महिलांची सतत छेड काढत असल्याने त्याच्याविरुद्ध गावकर्‍यांच्या मनात असंतोष आहे. या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिकांनी २३ जानेवारी या दिवशी मेणबत्ती मार्च काढला.

गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने येथे मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी आरोपीला कडक शासन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. (दिवसेंदिवस महिलांवरील वाढते अत्याचार पहाता सध्याचे कायदे पुरसे नसून आरोपींना धाक वाटावा अशा कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. तसेच वारंवार होणार्‍या घटना महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे, हेच अधोरेखित करतात ! – संपादक)