पुण्यातील नामांकित रुग्णालयाने जिन्याच्या कोपर्‍यात लावलेल्या देवतांच्या फरशा हटवल्या !

नंदुरबार येथील ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’च्या तक्रारीची तत्परतेने नोंद !

प्रतीकात्मक छायाचित्र

नंदुरबार, २२ जानेवारी (वार्ता.) – पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने जिन्यातील कोपर्‍यात देवतांच्या फरशा (टाईल्स) लावून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी येथील ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने ई-मेलद्वारे तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने तात्काळ त्या टाइल्स काढल्या. (देवतांच्या अवमानविषयी तत्परतेने कृती करणार्‍या हिंदु सेवा साहाय्य समितीचे हार्दिक अभिनंदन ! – संपादक)

हिंदु सेवा साहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत हे ५ जानेवारीला त्यांच्या मित्राच्या मुलाच्या शस्त्रकर्मानमित्त पुण्याच्या नामांकित रुग्णालयामध्ये गेले. तेथील जिन्यात भगवान शिव आणि श्रीराम यांचे चित्र असलेल्या फरशा लावल्याचे दिसले. हा हिंदूंच्या देवतांचा अपमान असल्याने हिंदु सेवा साहाय्य समितीने ७ जानेवारी या दिवशी ई-मेलद्वारे तक्रार प्रविष्ट केली. त्यात म्हटले होते की, २० जानेवारीपर्यंत कोपर्‍यात लावलेल्या देवतांच्या फरशा रुग्णालय प्रशासनाने आदरपूर्वक काढून टाकाव्यात; अन्यथा आपल्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा २९५- अ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येईल.

रुग्णालय प्रशासनाने तक्रारीची नोंद घेत हिंदु सेवा साहाय्य समितीला २० जानेवारीला ई-मेलद्वारे उत्तर पाठवले. त्यात म्हटले होते की, हिंदु देवतांच्या फरशा लावण्यामागे आमचा कुठल्याही हिंदु देवतांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. तुम्ही केलेल्या सूचनेची योग्य नोंद घेऊन आम्ही फरशा काढल्या आहेत.