हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ उत्तर गोव्याचे उपजिल्हाधिकारी श्री. गोपाळ पार्सेकर यांना निवेदन देतांना

पणजी, २० जानेवारी – ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर चित्रपट अभिनेते सैफ अली खान, डिंपल कपाडिया, महंमद जिशान अय्यूब आणि गौहर खान यांची भूमिका असलेली, तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेबसिरीज नुकतीच प्रसारित झाली आहे. या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे व्यक्तीरेखा दाखवून त्यांचाही अपमान केलेला आहे. याउलट ‘जेएन्यू’मधील देशद्रोही घोषणा देणारा कन्हैयाकुमार आणि तत्सम देशविरोधी घटकांचे उदात्तीकरणही करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले आहे. विद्वेषी ‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणावी, तसेच त्यातील सर्व दोषींवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याचे उपजिल्हाधिकारी श्री. गोपाळ पार्सेकर यांची भेट घेऊन त्यांना सुपुर्द केले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सौ. शुभा सावंत, सौ. प्रतिभा हळदणकर, सर्वश्री भारत हेगडे, केशव चोडणकर आणि प्रदीप जोशी यांचा समावेश होता.

या निवेदनात म्हटले आहे की, या वेबसिरीजमध्ये हिंदु देवतांचा अवमान तर केलाच आहे. त्याचसमवेत विद्यमान सरकार, पोलीस, प्रशासन आणि पंतप्रधान हे शेतकरी, मुसलमान अन् दलित यांच्या विरोधात असल्याचे दाखवून त्यांच्याविरोधात जातीय विद्वेष आणि हिंसेची भावना प्रसारित केली आहे. यामुळे एकूणच देशातील सामाजिक सलोखा, एकता, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था यांना धोका निर्माण होऊ शकतो. या वेबसिरीजच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वेबसीरीजना पैसा पुरवणारे, तसेच त्यांचे निर्माते यांचीही चौकशी करावी. ज्या प्रकारे चित्रपटांना सेन्सॉर करण्यासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आहे, त्या धर्तीवर कोणतेही नियंत्रण नसलेल्या अनिर्बंध वेबसिरीजवर अंकुश लावण्यासाठी, वेबसिरीजना ‘सेन्सॉर’ करणारी यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी. चित्रपट, नाटके, जाहिराती, वेबसिरीज आदींतून सातत्याने होत असलेला देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करावा. ‘अ‍ॅमेझॉन’ने यापूर्वी भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, भारतीय नकाशाचे विकृतीकरण करणे, हिंदु देवतांचा अवमान करणारी उत्पादने विकणे, हिंदु महिलांविषयीच्या आक्षेपार्ह पुस्तकांची विक्री करणे आदी अनेक गैरप्रकार केले आहेत. त्यामुळे हिंदूंमध्ये प्रचंड संताप आहे. आता ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ने राष्ट्र आणि धर्म विरोधी वेबसिरीज प्रसारित करून पुन्हा गुन्हेगारी कृत्य केले आहे. त्यामुळे शासनाने ‘अ‍ॅमेझॉन’वरही कठोर कायदेशीर कारवाई करावी. या निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय माहिती अन् प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनाही पाठवण्यात येणार आहे.