राष्ट्रीय स्तरावर हा ट्रेंड तिसर्या क्रमांकावर !
मुंबई – केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्या एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता १२ वीच्या पुस्तकात मोगल बादशाह शहाजहान आणि औरंगजेब यांनी युद्धात हिंदूंच्या पाडलेल्या मंदिरांची डागडुजी करण्यासाठी आर्थिक तरतूद केल्याचा उल्लेख केला आहे; मात्र याविषयी माहिती अधिकाराच्या अंतर्गत पुरावे मागितले असता एन्.सी.ई.आर्.टी.कडे ते नसल्याचे तिने सांगितल्याने निराधार इतिहास शिकवला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रप्रेमींनी एन्.सी.ई.आर्.टी.चा विरोध करण्यासाठी ट्विटरवर #NCERT_Fakes_History हा हॅशटॅग ट्रेंड केला. त्यावर २५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट्स केले. हा ट्रेंड राष्ट्रीय टे्रंडमध्ये तिसर्या क्रमांकावर होता. अनेकांनी चुकीचा इतिहास प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी एन्.सी.ई.आर्.टी.मधील उत्तरदायींवर कारवाई करण्याची आणि हा इतिहास त्वरित हटवण्याची मागणी केली.