पोलिसांवर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक  

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८२ टक्के मतदान  

लोकशाहीचा पाया असलेली ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यात निवडणूक आयोग अपयशी झाला, असे समजायचे का ?

जळगाव – जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेल्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात ८२ टक्के मतदान झाले. कानळदा येथे एका उमेदवाराच्या पतीची पोलीस अधिकार्‍यांशी झटापट झाली आणि पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. पोलीस गावात बंदोबस्तासाठी गेले असता महिला उमेदवार जयश्री गायकवाड आणि त्यांचे पती प्रभाकर गायकवाड यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. वाद वाढत जाऊन पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्याशीही झटापट झाली. गायकवाड दाम्पत्याला कह्यात घेऊन १५ जानेवारीच्या रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू होती.

जामनेर तालुक्यातील नागणचौकी येथे दोन गटांत वाद झाल्याने दीड घंटा मतदान प्रक्रिया लांबली. मतदानकेंद्राबाहेर जमलेली गर्दी बाजूला सारण्यावरून पारोळा तालुक्यातील तामसवाडी, जामनेर तालुक्यातील फत्तेपुर, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी लाठीमार केला म्हणून तामसवाडी येथील संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली.