भिवंडीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यशासन प्रयत्नशील असतांनाच दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी किंवा इजा पोचवण्यासाठी चक्क जादूटोणा होणे, हे कायद्याचा उपयोग होत नसल्याचे निदर्शक आहे का ?

ठाणे – भिवंडी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान पार पडले. तुरळक घटना वगळता या निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत; मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा केल्याचा प्रकार भिवंडीतील भिनार ग्रामपंचायतीच्या परिसरात समोर आला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

भिनार गावात ग्रामपंचायत निवडणुकीत विभाग क्रमांक १ मधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत जय बजरंग पॅनलचे भीमराव कांबळे, करून भोईर अन लक्ष्मी भोईर असे ३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांना हरवण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या प्रचार पत्रकात अर्धे लिंबू कापून, कुंकू आणि तांदूळ असा उतारा करून गावातील तलावाच्या बाजूला असलेल्या बोरीच्या झाडाखाली फेकून दिला होता. १६ जानेवारीला गावातील एक व्यक्तीला हा प्रकार लक्षात आला.