‘रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी पुढील प्रकारे सूप बनवून सकाळी किंवा सायंकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. ३ ते ४ आठवडे साधारण १ पाण्याचा पेला (अनुमाने ४०० मि.लि.) सूप प्रतिदिन प्यायल्याने हिमोग्लोबिन ८ टक्क्यांवरून ११ ते १२ टक्क्यांपर्यंत जाते, असा अनुभव आहे. पुढे १ पाण्याचा पेला सूप बनवण्यासाठीची घटकद्रव्ये आणि त्याची कृती दिली आहे.
१. घटकद्रव्ये
१ गाजर, पाव किंवा अर्धे बीट, पालकाची १० ते १५ पाने, अर्धा कांदा, हिरव्या मिरचीचा लहान तुकडा, आल्याचा लहान तुकडा, १ चमचा जिरे, चिमूटभर धने, १ मोठा चमचा तूप, तसेच चवीपुरते मीठ आणि साखर
२. कृती
अ. गाजर आणि बीट सोलून घ्यावेत.
आ. गाजर, बीट, पालक, कांदा आणि हिरवी मिरची चिरून घ्यावी.
इ. एका कढईत किंवा पातेल्यात थोडे तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे ,चिमूटभर धने, चिरलेला कांदा, मिरची, आले (ठेचून) घालावे. १ – २ मि. परतावे. त्यानंतर त्यात चिरलेले बीट, गाजर आणि पालक घालावे. या सर्व भाज्या शिजतील एवढे पाणी घालून भाज्या शिजवून घ्याव्यात.
ई. शिजलेल्या भाज्या थंड करायला ठेवाव्यात. त्या थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. वाटलेले मिश्रण सुपाच्या गाळणीतून गाळून घ्यावे. भाज्या शिजवलेले पाणीही यात मिसळावे.
उ. गाळलेले मिश्रण दाट असल्यास त्यात थोडे पाणी मिसळून एक उकळी काढावी.
ऊ. यात चवीपुरते मीठ आणि साखर घालून सूप गरम गरम पिण्यासाठी द्यावे.
ए. यामध्ये आवश्यतेनुसार वरून तूप, जिरे आणि हिंग यांची फोडणी देता येते. चव येण्यासाठी लिंबू पिळले तरी चालते. आवडीनुसार घरी केलेले ताजे लोणीही घालता येते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर आणि सौ. जानकी नीलेश पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२१)