इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. अनिकेत जमदाडे अन् हसतमुख आणि शांतपणे सेवा करणार्‍या चि.सौ.कां. मानसी अग्निहोत्री !

फाल्गुन शुक्ल त्रयोदशी (१२.३.२०२५) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात साधना करणारे चि. अनिकेत जमदाडे आणि चि.सौ.कां. मानसी अग्निहोत्री यांचा शुभविवाह रामनाथी आश्रमात आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. अनिकेत जमदाडे आणि चि.सौ.कां. मानसी अग्निहोत्री यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

चि. अनिकेत जमदाडे

चि. अनिकेत जमदाडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. श्री. नीलेश सुर्वे, सनातन आश्रम, गोवा.

१ अ. भावपूर्ण सेवा करणे : ‘एकदा मी रुग्णाईत होतो. श्री. अनिकेतदादांनी माझ्यासाठी जेवणाचा डबा पाठवला होता. त्याने तो डबा एवढा व्यवस्थित पाठवला होता की, तो उघडल्यावर त्यातून चांगली स्पंदने येत होती. डबा पाहिल्यावर मला कृतज्ञता वाटली.’

२. श्री. दामोदर गायकवाड, सनातन आश्रम, गोवा.

२ अ. सहसाधकांशी समभावाने वागणे : ‘तो उच्चशिक्षित आहे, तरीही तो सर्वांशी मनमोकळेपणे आणि सहजतेने बोलतो. ‘गुरूंचे सर्व साधक सारखेच आहेत’, असे त्याच्या बोलण्यातून लक्षात येते.

२ आ. सेवेची तळमळ : दिवसभर सेवा करूनही ‘दादाच्या चेहर्‍यावर थकवा आला आहे’, असे कधीच दिसत नाही.’

३. सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, गोवा.

३ अ. प्रेमभाव : ‘चि. अनिकेतदादाला सेवेनिमित्त कधीही साहाय्य मागितल्यास तो तत्परतेने साहाय्य करतो. तो रुग्णाईत साधकांची स्वतःहून विचारपूस करून त्यांना साहाय्य करतो.

३ आ. हसतमुख आणि इतरांना समजून घेणे : एखाद्या साधकाची मनःस्थिती चांगली नसल्यास दादा अशा साधकाची स्थिती समजून घेतो आणि त्याला न दुखावता त्याच्याशी संवाद साधतो. दादा सतत हसतमुख असल्याने आणि त्याच्यातील सहजतेमुळे साधकांना त्याच्याशी जुळवून घेण्यास कठीण जात नाही.

३ इ. तो कुठलीही नवीन सेवा लगेच स्वीकारतो आणि तत्परतेने पूर्ण करतो.

३ ई. गुरु आणि संत यांच्याप्रती भाव असणे : तो आश्रमात साधना करण्यासाठी आल्यापासून त्याला अनेक संतांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच सर्व संत यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करावी’, असा त्याचा विचार असतो. तो कठीण प्रसंगात देवावर श्रद्धा ठेवून स्थिर रहाण्याचा प्रयत्न करत असतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २८.२.२०२५) 

चि.सौ.कां. मानसी अग्निहोत्री यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि.सौ.कां. मानसी अग्निहोत्री

१. सौ. मैथिली मयूर फडके (मानसीची मैत्रीण), शिरोडा, गोवा.

१ अ. निरागस वृत्ती : ‘मी आणि मानसी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत. तिच्यामध्ये निरागसता आहे. ती सर्वांना आपलेसे करून घेते.

१ आ. संयम : मानसीला तिच्या उत्तरदायी साधकांनी सेवा दिल्यावर ती ताण न घेता सेवा पूर्ण करते. ती सेवेतील अडचणी शांतपणे विचारून घेऊन सोडवते.’

२. सौ. वैशाली श्रीराम देसाई (मानसीच्या मैत्रिणीची आई), अंबरनाथ, ठाणे.

२ अ. साधनेची आवड : ‘मानसी शाळेत असल्यापासून अभ्यासात हुशार होती. तिने शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर साधना करण्याचा निर्णय घेतला. ‘तिने मायेतील जीवन सोडून आध्यात्मिक जीवन जगण्यास आरंभ केला’, याचे मला कौतुक वाटते.’

(१४.२.२०२५)

३. सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ अ. ‘मानसी मनाने निर्मळ आणि निरागस आहे.

३ आ. ती रुग्णाईत साधकांची स्वतःहून विचारपूस करते आणि ‘साधकांना काय हवे-नको ?’, ते पहाते.

३ इ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : मानसी व्यष्टी साधना गांभीर्याने आणि नियमित करते. ती तिच्याकडून झालेल्या चुका लगेच स्वीकारते आणि क्षमायाचना करते.

३ ई. हसतमुख आणि शांतपणे सेवा करणे : ती नेहमी हसतमुख असते. मानसीकडे बर्‍याच सेवा असतात, तरीही तिच्या चेहर्‍यावर कधीही ताण जाणवत नाही. ती सर्व सेवा शांतपणे करते. ती आश्रमामध्ये होणार्‍या यज्ञाचे नियोजन पुढाकार घेऊन करते.

३ उ. मानसीमध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.’

उखाणे

  • धर्म-अर्थ-काम-मोक्ष साधून पुरुषार्थ चार । 
    गुरुकृपेने  … सह व्हावा हा भवसागर पार ॥
  • ज्ञान आणि योग यांपेक्षा श्रेष्ठ आहे भक्ती । 
    … सह संसार करतांना राहो निष्ठा गुरुचरणांप्रती ॥

(२८.२.२०२५)