३१.१.२०२५ ते २.२.२०२५ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पुणे येथील धर्मप्रेमी श्री. बाळकृष्ण घोरपडे यांना येण्याची संधी मिळाली. त्या वेळी आश्रम पाहिल्यावर त्यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.

१. आश्रमात स्वागत करणे, व्यवस्थापन आणि सात्त्विक वातावरण पाहून भावजागृती होणे
‘३०.१.२०२५ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पोचलो. मी पहिल्यांदाच सनातन संस्थेचा आश्रम पहात होतो. रात्रीची वेळ असली, तरीही आश्रमात स्वागत करणे, व्यवस्थापन आणि सात्त्विक वातावरण पाहून माझे मन भरून आले.
२. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि पवित्रता असलेला, तसेच सात्त्विक अन् आनंददायी जेवण मिळणारा भोजनकक्ष
रात्री १० वाजता मी आश्रमात पोचल्यावर लगेचच जेवणासाठी मला भोजनकक्षात नेले. मी तेथील पटलांची मांडणी, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहून थक्क झालो. तेथे सर्वत्र पवित्रता आणि शिस्त जाणवत होती. विशेष म्हणजे येथील साधकांनी बनवलेले जेवण केवळ चविष्ट नव्हे, तर हलके, सात्त्विक आणि आनंददायी होते. खर्या अर्थाने हे केवळ भोजन नव्हे, तर एक आध्यात्मिक अनुभव होता.

३. शिस्त, स्वच्छता, कार्यक्षमता आणि नि:स्वार्थ सेवा यांचा आदर्श असलेले व्यवस्थापन
आमच्या निवासाच्या ठिकाणी गेल्यावर ‘तेथील प्रत्येक खोली विश्रामलयालाही (‘हॉटेल’लाही) मागे टाकेल इतकी नीटनेटकी होती’, असे मला वाटले. खोलीतील कपाट, पलंग आणि स्नानगृह हे सर्वकाही नीटनेटके, आधुनिक अन् आल्हाददायक होते. इतकी उत्तम योजना पाहून ‘गोदरेज किंवा अन्य आंतरराष्ट्रीय आस्थापनांमध्ये पाहिलेल्या व्यवस्थापनांपेक्षा अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक कार्यसंस्कृती येथे आहे’, असे मला जाणवले. आश्रमाच्या व्यवस्थापनाचा स्तर हा जागतिक दर्जाचा आहे. येथे केवळ धर्म नाही; तर शिस्त, स्वच्छता, कार्यक्षमता आिण नि:स्वार्थ सेवेचे आदर्श अनुभवता येतात.
४. आश्रमात जाणवलेली दैवी स्पंदने आणि आध्यात्मिक शक्ती
अ. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री सिद्धिविनायकाचे एक सुंदर मंदिर आहे. ते मला दुर्मिळ आणि पवित्र वाटले.
आ. आश्रमातील स्वागतकक्षामध्ये श्रीकृष्णाचे सात्त्विक चित्र, सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भव्य छायाचित्रे आहेत. विशेष म्हणजे ही चित्रे केवळ प्रतिमा नसून ती सजीव आणि ऊर्जावान भासतात.
इ. संपूर्ण आश्रमात चैतन्याची अनुभूती येते. प्रत्येक माळ्यावरील लाद्यांना गुरुमाऊलींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) स्पर्श झाल्याने त्या इतक्या झळाळतात की, त्यांमध्ये प्रत्येक वस्तूचे प्रतिबिंब दिसते. दोन ठिकाणी लाद्यांवर ‘ॐ’ आणि एक अनिष्ट शक्तीचा चेहरा उमटलेला आहे, जे धर्म अन् अधर्म यांच्यातील लढाईचे प्रतीक आहे. हे सर्व पाहून एका वेगळ्याच आध्यात्मिक शक्तीचा अनुभव मिळतो.
५. साधक आणि संत यांच्यामध्ये सात्त्विकता अन् भक्ती यांचे दर्शन होणे
आश्रमातील साधक, संत आणि प्रबोधन करणारे साधक यांचे चेहरे सात्त्विक आणि आनंदी जाणवले. त्यांच्या जीवनशैलीत सात्त्विकता आणि भक्ती सहजतेने प्रकट होत होती. जर तुम्हाला नि:स्वार्थ सेवा, सात्त्विक जीवनशैली आणि आध्यात्मिक उन्नती यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकदा तरी या आश्रमाला भेट द्या.
६. संसाराच्या धावपळीमध्ये ‘आत्मशुद्धी आणि शांतता’ यांचे काही क्षण अनुभवण्यासाठी सनातनच्या आश्रमाला भेट देणे आवश्यक !
संसाराच्या धावपळीमध्ये ‘आत्मशुद्धी आणि शांतता’ यासाठी काही क्षण वेचायचे असतील, तर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमासारखे स्थळ क्वचितच सापडेल. रामनाथी आश्रम हे केवळ धार्मिक स्थळ नाही; तर ते चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा यांनी भारलेले स्थळ आहे. ‘शांतता, दिव्यता आणि आत्मशुद्धी’ हे सर्व एका ठिकाणी अनुभवायचे असेल, तर रामनाथी आश्रम आपल्यासाठी सदैव उघडा आहे.’
– श्री. बाळकृष्ण घोरपडे (वय ७३ वर्षे), पुणे (४.२.२०२५)