पणजी – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने नुकताच दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ स्वरूपात आयोजित केलेल्या सामूहिक नामजप कार्यक्रमाला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सनातन संस्थेच्या कु. संगीता नाईक यांनी नामजप सत्संगाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. आर्या गावकर यांनी दत्तजयंतीचे वैशिष्ट्य सांगून सर्वांकडून सामूहिक प्रार्थना आणि ‘श्री गुरुदेव दत्त ! ’ हा जप करून घेतला. सामूहिक नामजपामुळे देवाप्रती भक्तीभाव वृद्धींगत होणे, मन एकाग्र होणे, चैतन्य अनुभवता येणे आदी अनुभूती आल्याचे उपस्थितांनी सांगितले. या कार्यक्रमाचा १५० जिज्ञासूंनी लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. सत्संग सायंकाळी ७ वाजता चालू होणार होता; परंतु सत्संग चालू होण्यापूर्वी सायंकाळी ६.४५ वाजता सुमारे १० हून अधिक जिज्ञासूंनी कुटुंबियांसमवेत घरी सामूहिक नामजप केला.
२. एका जिज्ञासूच्या वडिलांचे निधन होऊन ८ दिवस उलटले होते, तरीही हे जिज्ञासू ‘नामजप सत्संगाद्वारे दत्तात्रय महाराजांचा जप करण्याची संधी मिळाली’, असा भाव ठेवून नामजप सत्संगाला जोडले होते. त्यांनी घरच्या लोकांनाही नामजप करायला सांगितला.
३. सत्संगात नामजप शास्त्रशुद्ध आणि लयीत व्हावा, यासाठी सत्संगात सनातन-निर्मित नामजपाचा ‘ऑडिओ’ लावण्यात आला होता. त्यामुळे वातावरण सात्त्विक बनून दत्ततत्त्व जागृत झाल्याची अनुभूती उपस्थित जिज्ञासूंनी घेतली.