राज्यपाल निधीतून पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

भंडारा रुग्णालयातील आग दुर्घटना प्रकरण

भंडारा –  ८ जानेवारी या दिवशी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून १० निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना राज्यपाल निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १३ जानेवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली. १३ जानेवारीला सकाळी ९ वाजता त्यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या भीषण जळीतकांडाची चौकशी करण्यासाठी  विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती १२ जानेवारी या दिवशी सकाळी भंडारा येथे आली आहे. या समितीने रुग्णालयाची पाहणी करून नंतर ४ घंटे रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका आणि कर्मचारी यांची चौकशी करून जबाब नोंदवले. आगीचे नेमके कारण, रुग्णालयातील ‘फायर एक्स्टिंग्विशर’, ‘स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट’, तसेच इतर सुरक्षात्मक गोष्टींची चौकशी या समितीने केली.