नगर येथील केंद्रीय संस्था राज्याबाहेर जाण्याची शक्यता

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विरोध

नगर – येथील वाहन संशोधन आणि विकास संस्था (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट- व्हीआरडीई) चेन्नईला स्थलांतरित करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाने चालू केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था स्थलांतरित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासह कर्मचारी संघटनेनेही विरोध केला आहे.

या संस्थेच्या देशात ५२ शाखा आहेत. नगरच्या शाखेतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक उपयुक्त संशोधने केली आहेत. संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि अन्य सामुग्री येथे विकसित झाली आहे. याशिवाय वाहनांची पडताळणी करून त्यांना प्रमाणित करणारा विशेष ट्रॅकही या संस्थेत आहे. ही संस्था स्थलांतरित केल्यास स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या विरोधात आंदोलन करण्याची चेतावणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली आहे.