महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या कमाल संधी मर्यादेचा नियम अन्यायकारक ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, ५ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या कमाल संधी मर्यादेचा नियम अन्यायकारक आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे ‘करियर’ धोक्यात येणार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात आयोगाने परीक्षेला बसण्याच्या कमाल संधीविषयक घोषित केलेल्या नवीन नियमावलीनुसार खुल्या गटातील विद्यार्थ्यांना ६ वेळा, ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना ९ वेळा आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही मर्यादा नाही. नियमावलीनंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून अनेक संघटनांनी याला विरोध केला.  चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयाची अट आहे. त्यामुळे वयोमर्यादेच्या अटीनुसार विद्यार्थी उद्दिष्ट ठेवून अभ्यास करतो. या अगोदर परीक्षेला बसण्याच्या संधीसाठी कोणतीही मर्यादा नव्हती. नवीन नियमावलीमुळे संधीवर मर्यादा येत आहे. ती मर्यादा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसर्‍या क्षेत्राकडे वळावे लागेल. त्यातही अनिश्‍चितता असेल. प्रत्येक विद्यार्थी परीक्षा देतांना शुल्क भरतो. मग कमाल संधीचा नियम कशासाठी ? राज्य सरकार ‘हम करेसो कायदा’ अशा पद्धतीने कारभार करत आहे. त्यामुळे ‘विद्यार्थ्यांवर अन्याय करणार’, हा नियम सरकारने मागे घ्यावा.’’