पुणे येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली

इंग्रजांच्या विरोधात हुतात्मा झालेल्या सर्व वीरांना अभिवादन ! – आनंद दवे, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

हुतात्म्यांना श्रद्धांजली वहातांनाअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते

पुणे – प्रतिवर्षी १ जानेवारी हा ‘विजय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. सकाळी ११ वाजता येथील ससून रुग्णालयाच्या चौकातील हुतात्मा स्तंभाला फुले वाहून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे आणि त्यांचे सहकारी यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी बोलतांना श्री. आनंद दवे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी स्वत:चे रक्त सांडले, प्राणांचे बलिदान दिले त्यांना आदरांजली वहाण्यासाठी आम्ही आज येथे जमलो आहोत.

सर्व जातीच्या लोकांनी या लढ्यात सहभाग घेतला होता. त्या सर्वांना आदरांजली वहाण्याची प्रथा आम्ही चालू केली आहे. इथून पुढे प्रतिवर्षी ही प्रथा चालू ठेवली जाईल आणि ती वाढतच जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पदाधिकार्‍यांच्या सोबत हा कार्यक्रम पार पडला. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या वेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणाही देण्यात आल्या.