औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असणे, हा शिवरायांचा अपमान ! – शिवसेना

छत्रपती संभाजीराजे

मुंबई – ३५० वर्षांपूर्वी जेव्हा औरंगाबादच्या मातीत मोगल राजा औरंगजेबाला गाडले, तेव्हा सर्व हिंदुस्थानात जल्लोष झाला होता. छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदु धर्माचा त्याग करून मुसलमान धर्म स्वीकारावा, यासाठी औरंगजेबाने त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले; पण संभाजीराजांनी हौतात्म्य पत्करून हिंदुत्व राखले. त्या औरंगाजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असावे, हा शिवरायांचा अपमान ठरतो, अशी भूमिका दैनिक ‘सामना’च्या २ जानेवारीच्या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याविषयी चर्चा चालू असतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्याला विरोध दर्शवला, तर भाजपकडून या प्रकरणी टीका करण्यात येत आहे. याविषयी दैनिक ‘सामना’ मधून शिवसेनेने वरील भूमिका मांडली आहे.


या अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेनेने भूमिका पालटलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वीच सार्वजनिकरित्या औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ हा लोकनिर्णय आहे. जे निजामी अवलादीचे आहेत, ते औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे. बाबर हा येथील मुसलमानांचा मायबाप लागत नाही, तसा पापी औरंग्याही येथील मुसलमानांचा काका-मामा लागत नाही. औरंग्याचे कब्रस्तान कुणाला निधर्मीपणाचे किंवा अस्मितेचे प्रतीक वाटत असेल, तर या देशाच्या अस्मितेचा खेळखंडोबा करत आहेत. महाराष्ट्राचे शासन किमान समान कार्यक्रमाच्या कार्यवाहीसाठी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी-कष्टकरी यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहे, तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे आणि शासनाला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच.