५ जुलै२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या निमित्ताने साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांशी झालेल्या भेटींच्या वेळची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्या वेळी साधकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
१ जानेवारी या दिवशी मार्गदर्शनातील काही सूत्रे आपण पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
(भाग २)
५. ‘साधनेविषयी आपल्याला जे जे ठाऊक आहे, ते दुसर्यांना सांगून त्यांना साहाय्य करणे’, ही समष्टी साधनाच आहे !
साधक : सेवा करतांना जे नवीन साधक आमच्या संपर्कात येतात, ते आम्हाला साधनेविषयी प्रश्न विचारतात. त्या वेळी उत्तर देतांना ‘परमात्मा मला ज्ञान देत आहे’, असे मला वाटते. मी त्यांना सांगतो, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून आपण (परात्पर गुरु डॉक्टर) जे ज्ञान देत आहात, तेच मी सांगत आहे.’’ त्यांना सांगितल्यानंतर माझ्या मनात येते, ‘मला स्वतःला तर काहीच येत नाही. दुसर्यांना सांगण्याची माझी काही पात्रता नसतांना दुसर्यांना कसे सांगावे ?’ हे योग्य कि अयोग्य आहे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘मी सांगितले’, असा अहं झाला, तर असे वाटणे योग्य आहे; परंतु ‘त्याला साधना समजावून सांगितली, ‘राष्ट्र आणि धर्म यांविषयी कसे दृष्टीकोन असायला पाहिजेत ?’, हे सांगितले, तर ती सेवा झाली. त्याविषयी विचार करायचा नाही.
साधक : ‘मी स्वतः कृतीत आणून त्यांना असे सांगणे योग्य आहे; मात्र मी स्वतः कृती करत नसतांना इतरांना सांगणे योग्य आहे का ?’, असे वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपण भक्तीमार्गाने साधना करतो. कुणी ज्ञानमार्गाविषयी प्रश्न विचारला, तरीसुद्धा आपण त्याच्या उन्नतीसाठी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. आपण ते सगळे कृतीत कसे आणणार ? आपला उद्देश चांगला आहे. इतरांना सांगितल्यावर आपल्यामध्ये अहं निर्माण होत नसेल, तर ‘सांगणे’ ही साधना आहे. ‘मी करत आहे कि नाही ?’, असा विचार करायला नको.
साधक : साधकांना सांगितल्यानंतर त्यांना मी जे काही सांगितले, ते त्वरित माझ्या मनातून निघून जाते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : फारच चांगले आहे ! आपली सेवा आणि नाम पुन्हा चालू ! आपल्याला वर्तमानकाळात रहायचे आहे. तो क्षण निघून गेला. आता त्याविषयी कशाला विचार करायचा ? ‘दुसर्यांना सांगणे’, हीसुद्धा तुमची साधनाच झाली.
साधक : माझ्यासह सेवा करणार्या माझ्या पत्नीला वाटते, ‘हे कशाला त्यांना सांगत आहेत ? ते स्वतः तर काहीच कृती करत नाहीत, तर दुसर्यांना कशाला सांगत आहेत ?’
परात्पर गुरु डॉ. आठवले : असे नसते. आधुनिक वैद्याला स्वतःला क्षयरोग झाला नाही, तरी तो दुसर्यांना क्षयरोगाची औषधे का बरे देतो ? ‘जे आपल्याला ठाऊक आहे, ते दुसर्यांना सांगून त्यांना साहाय्य करणे’, ही साधना झाली.
६. ‘ईश्वरप्राप्तीच्या उद्देशाने प्रयत्न (साधना) करणे’, हे पूर्णवेळ कार्य आहे !
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘भगवंताची प्राप्ती करणे’, हे पूर्णवेळ कार्य आहे. हे अर्धवेळ कार्य नाही; परंतु पूर्णवेळ करणे कठीण होते. ‘अरे, माझे कसे होणार ?’, असा मनावर ताण येतो. ५० टक्के आध्यात्मिक पातळी होईपर्यंत भगवंतावर एवढा विश्वास नसतो की, तो सर्वकाही करील. माया आणि ईश्वर या दोन्ही बाजू आपल्याला ओढत रहातात; परंतु आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली की, मनोलय व्हायला लागतो. तेव्हा केवळ ‘ईश्वरप्राप्ती’ हेच ध्येय रहाते.
७. ५० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर ‘साधनेतून आनंद मिळतो’, याची अनुभूती येणे आणि त्या वेळी ‘मायेत परत जावे’, असे न वाटणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : शेवटी तन-मन-धन सर्वकाही (भगवंताला) अर्पण करायचे आहे. आज जेवढे शक्य आहे, तेवढे आपण करतो. नंतर नोकरी, व्यवसाय इत्यादी सर्वांचा कंटाळाच येतो. ‘काय हे मायेतील जीवन जगणे ?’, असे आपल्याला वाटायला लागते. आपल्याकडे सनातन संस्थेमध्ये किती जण पूर्णवेळ साधक आहेत, पाहिलेत ना ? आधुनिक वैद्य, वकील, लेखापाल, अभियंता आणि इलेक्ट्रॉनिक्सची (विद्युत्प्रवाहावर चालणार्या उपकरणांसंबंधी) सेवा करणारे आहेत. ‘साधनेतून आनंद मिळतो’, याची एकदा अनुभूती घेतली, तर मायेत परत कोण जाणार ? परंतु हे ५० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर होऊ लागते. तेव्हा ईश्वरावर श्रद्धा असते.
(क्रमश: उद्याच्या अंकात)