औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी विभागीय आयुक्तांचा शासनाकडे प्रस्ताव

मुंबई – औरंगाबाद जिल्ह्याचे शासनाकडून अधिकृतरीत्या संभाजीनगर असे नामकरण करावे, यासाठी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडून शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

यापूर्वी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे शासन असतांना वर्ष १९९५ मध्ये औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता; मात्र त्या विरोधात एका मुसलमान व्यक्तीने न्यायालयात याचिका केली होती. त्यामुळे हा नामांतराचा विषय रखडला. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे शासन आल्यावर शासनाने हा प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे ही याचिका आपोआप रहित झाली. याविषयीचा संदर्भ देऊन विभागीय आयुक्तांनी हा नवा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे; आता यावर मंत्रीमंडळात निर्णय होऊन प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवण्यात येईल. केंद्रशासनाची मान्यता मिळाल्यावर हे नामांतर होऊ शकेल.

नुकत्याच झालेल्या संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने घोषणपत्रात औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आश्‍वासन दिले होते. या निवडणुकीत भाजपला चांगले मतदान झाले होते. त्यानंतर आता मनसेकडूनही संभाजीनगर नामकरणाची मागणी करण्यात येत आहे. मनसेकडून तसे फलकही संभाजीनगर येथे लावण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांनी ही मागणी केली असली, तरी राज्यातील महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असल्यामुळे औरंगाबादच्या नामांतराला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल का ?, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.