राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी यांना दिंडोशी न्यायालयाकडून नोटीस

‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करण्यासाठी मनसेने चेतावणी दिल्याचे प्रकरण

मुंबई – ‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, याविषयी मनसेने दिलेल्या चेतावणीवरून ‘अ‍ॅमेझॉन’ने न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी दिंडोशी न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे अन्य पदाधिकारी यांना ५ जानेवारीपर्यंत न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.

‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, यासाठी मनसेकडून ‘अ‍ॅमेझॉन’ला ‘ईमेल’ही पाठवण्यात आले होते. ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या वतीने ‘मेल’ला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता; मात्र त्यानंतर ‘अ‍ॅमेझॉन’कडून थेट मनसेच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली.

‘अ‍ॅमेझॉन’ला सह्याद्रीचे पाणी पाजणार हे नक्की ! – अखिल चित्रे, मनसे


मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ‘अ‍ॅमेझॉन’ला महाराष्ट्रात व्यवसाय करू देत आहे, हे विसरता कामा नये. ‘अ‍ॅमेझॉन’ला सह्याद्रीचे पाणी पाजणार, हे नक्की आहे. खटले प्रविष्ट करण्याचा प्रयोग त्यांनी चालू केला आहे. आज त्यांनी राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्याचे दु:साहस केले आहे. अशा फालतू नोटिशीला आम्ही अधिक महत्त्व देत नाही. मराठीसाठी कोणतेही खटले अंगावर घेण्याची आमची सिद्धता आहे, हे ‘अ‍ॅमेझॉन’ने लक्षात ठेवावे.