सध्या गर्भवती असलेल्या अभिनेत्रींची छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्याची नवरूढी निर्माण झाली आहे. प्रसिद्धीमाध्यमेही त्याला बिनधोक प्रसिद्धी देऊन त्यांच्यातील स्पर्धा सांभाळत असतात. बहुतांश अभिनेत्री तशाही निलाजर्या असतात, याविषयी कुणाचे दुमत नसेल. सध्याच्या काळानुसार शक्य तितके चित्रविचित्र पद्धतीचे पोशाख आणि अधिकाधिक देहप्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात रहाणे अन् पैसे मिळवणे, हा त्यांच्या व्यवसायाचा एक भाग असतो. आता गर्भवती झाल्यावरही या व्यवसायात खंड पडू न देण्याचा मानस त्यांच्या स्वतंत्र वृत्तीला साजेसाच म्हणावा लागेल !
मातृत्व हे जगातील कुठल्याही स्त्रीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी एक आनंददायी गोष्ट असते. गर्भवती महिलांकडे आदराने आणि प्रेमाने पहाण्याची, त्यांना विशेष सुविधा देण्याची शिष्टाचाराची पद्धत जगभरातील समाजात आहेे. भारतीय संस्कृतीत तर गर्भवती स्त्रीला खूप जपले जाते; कारण त्यामागे अनेक अंगांनी सखोल विचार केलेला आहे. सध्याच्या गर्भवती अभिनेत्रींनी देहप्रदर्शन करत प्रसिद्ध केलेली त्यांची छायाचित्रे ही गर्भवती स्त्रीकडे आदराने पहाण्याच्या मनोभूमिकेला पूर्णपणे तडा देणारी आहेत.
मुळात कुठल्याही देहप्रदर्शनाचा उद्देश हा केवळ निखळ सौंदर्याचा आस्वाद घेण्यापर्यंत मर्यादित नसतो. कित्येकदा त्याच्याही पुढे जाऊन त्यातील कामुकता आणि अश्लीलता लपून रहात नाही. गर्भवती अभिनेत्रींची देहप्रदर्शन करणारी ही चित्रे सर्वच वयोगटांतील सर्वच जण पहातात. वैयक्तिक आयुष्यातील मातृत्वासारख्या अतीसंवेदनशील गोष्टीचेही अशा प्रकारे व्यावसायिकरण करून अभिनेत्रींनी तर लज्जामुक्ततेची परिसीमाच गाठली आहे. कुणी योगासने करत, कुणी पाण्याखाली अर्धनग्न पोहतांना, तर कुणी रॅम्पवर चालत त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून पैसे कमवतात. बघणारेही ते रस घेऊन बघतात. हा कलियुगाचा महिमा आहे. विशेष म्हणजे स्त्रीमुक्तीवाल्यांना हे खटकत नाही. शरिराचा असा बाजार मांडणे, ही ‘स्वातंत्र्याची नव्हे, तर अवमानाची गोष्ट आहे’, असे त्यांना वाटत नाही. खरे तर भारतातील कुठल्याही सामान्य स्त्रीला हे लक्षात येते; मात्र देहप्रदर्शन ही दृष्टीसुख आणि पैसा यांचे देवाण-घेवाण करण्याची गोष्ट मानणार्यांना हे कसे कळणार ?
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.