झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप !  

सामाजिक माध्यमातून पीडित तरुणीचे पोलिसांना लिहिले पत्र प्रसारित

पूज्यापाद संतश्री आसाराम बापू यांच्यावरही राजस्थानमधील कथित प्रकरणावरून देहली पोलिसांत तक्रार करून कारवाई करण्यात आली होती. त्यांना एक न्याय, तर हेमंत सोरेन यांना वेगळा न्याय का ? याविषयी केंद्र सरकारने हस्तक्षेप करत या घटनेची चौकशी करावी !

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन

मुंबई – सामाजिक माध्यमातून वांद्रे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला लिहिले एक पत्र प्रसारित होत आहे. यात एका तरुणीने झारखंडचे मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. तसेच यावरून ‘#JusticeForNatasha असा ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड होत आहे. जुलै २०१३ ते डिसेंबर २०१४ या काळातही हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होते.

या पत्रात म्हटले आहे की, वर्ष २०१३ मध्ये ही तरुणी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली होती. तेव्हा तिची मैत्री सुरेश नागरे नावाच्या व्यक्तीशी झाली. ५ सप्टेंबरला त्याने हॉटेल ताज लँडमध्ये बोलावले होते. ‘मी काही मोठ्या लोकांशी तुझी भेट घडवणार आहे’, असे त्याने साांगितले होते. जेव्हा मी तेथे पोचले, तेव्हा तेथे केवळ ३ जणच होते आणि त्यात एक झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन होते. येथे माझ्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात गेले असता मला हाकलून लावण्यात आले; कारण हेमंत सोरेन मोठ्या पदावर होते. या घटनेनंतरही सुरेश नागरे मला हेमंत सोरेन यांच्याकडे पाठवण्यासाठी संपर्क करत होता; मात्र मी त्याकडे दुर्लक्ष केले. याविषयी मी नंतर ६ हून अधिक तक्रारी पोलिसांत केल्या. यानंतर मला आणि माझ्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. माझ्यावर दबाव टाकून एका कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली. त्याद्वारे तक्रार मागे घेण्याचे त्यात लिहिण्यात आले.

खासदार निशिकांत दुबे यांची चौकशीची मागणी

या बलात्काराच्या संदर्भात जुलै २०२० मध्ये गोड्डा येथील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही या प्रकरणी ‘हेमंत सोरेन यांच्यावर बलात्कार आणि अपहरण केल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला अन् नंतर तो तडजोड करत मागे घेण्यात आला. त्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी केली होती. पोलीस महासंचालकांच्या माध्यमांतून हेमंत सोरेन स्थानिक माफियांना हाताशी धरून पीडितेची हत्या करू इच्छित आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. तसेच या पीडितेला संरक्षण देण्याची मागणी केली होती.