पालकांनो, मुलांच्या प्रगतीचा निखळ आनंद अनुभवण्याकरता स्वत: ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करून मुलांवरही साधनेचे आणि धर्माचरणाचे संस्कार करणे महत्त्वाचे !

१. पू. पात्रीकरकाका यांच्या मुखावरील त्यांच्या मुलींच्या आध्यात्मिक प्रगतीमुळे झालेला निखळ आनंद दर्शवणारे छायाचित्र पहातांना स्वतःलाही आनंद मिळणे : ‘एकदा मी छायाचित्रपरिचय (कॅप्शन्स) सिद्ध करण्याची सेवा करत होते. त्या वेळी सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकरकाका यांचे त्यांच्या मुलींनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानिमित्त मुलींना भेटवस्तू देऊन सत्कार करतांनाचे छायाचित्र पहायला मिळाले. पू. काकांच्या मुखावर ओसंडून वहाणारा निखळ आनंद पहातांना मला आनंद वाटत होता.

श्रीमती मेघना वाघमारे

२. पू. पात्रीकरकाकांच्या उदाहरणावरून आई-वडिलांना मुलांच्या अध्यात्मातील प्रगतीतूनच निखळ आनंद मिळतो, हे लक्षात येणे : पू. काका आणि त्यांचे कुटुंबीय सर्वस्वाचा त्याग करून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वेळ साधना करत आहेत. पू. काका स्वतः अभियंता (इंजिनियर) आहेत. ‘जीवन-प्राधिकरणा’सारख्या शासकीय खात्यामध्ये चाकरी आणि सधनता या त्यांच्या व्यावहारिक जीवनातील जमेच्या बाजू. असे असूनही त्यांनी स्वतःच्या मुलांवर साधना आणि धर्माचरण यांचे संस्कार केले. ‘स्वतःच्या मुलांनी अध्यात्मात प्रगती करावी, साधनेत पुढेे जावे’, ही त्यांच्या मनीची इच्छा ! ‘साधनेचे महत्त्व ज्याला कळले’, तोच असे इच्छितो. मुलींच्या आध्यात्मिक प्रगतीने ती इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांच्या मुखावर एक पिता म्हणून वेगळाच आनंद दिसला. वृद्धापकाळाची काळजी नाही कि मुलांकडून अन्य कोणतीही अपेक्षा नाही. (पू. काकांना कोणत्याही साधकाने प्रगती केली की, आनंद होतोच.) या उदाहरणावरून ‘आई-वडिलांना मुलांच्या अध्यात्मातील प्रगतीतूनच निखळ आनंद मिळतो’, हे लक्षात येते.

३. मुलांना चांगले गुण मिळण्यासाठी धडपडणार्‍या पालकांसाठी मुलांवर देवाधर्माचे, साधनेचे चांगले संस्कार करणे, त्यांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभणे इत्यादी गोष्टी दुय्यम ठरतांना दिसणे :
समाजात मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळते. ‘संत ज्ञानेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे व्यक्तीमत्व दुसर्‍याच्या घरात जन्माला यावे; मात्र आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर होऊन पुष्कळ पैसा मिळवावा’, असे बहुतांश लोकांना वाटते. यासाठी अगदी लहानपणापासूनच ते अभ्यासासाठी मुलांच्या पाठी लागतात. ‘मुलांनी प्रत्येक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवावेत’, असे त्यांना वाटत असते. त्यासाठी त्या बापड्या मुलांपेक्षा पालकच स्पर्धेत उतरलेले दिसतात. ‘त्या बालकाची क्षमता असो अथवा नसो, तसेच घोकंपट्टी करून का होईना, त्याने अगदी बालवाडीपासूनच चांगले गुण मिळवावेत’, असे पालकांना वाटत असते. मुलांच्या परीक्षांचा ताण त्यांच्या मातांनाच आलेला दिसतो. ‘मुलावर देवाधर्माचे, साधनेचे चांगले संस्कार व्हावेत, त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असावे’, या गोष्टी पालकांसाठी दुय्यम ठरतांना दिसतात.

४. मुलाने चांगले गुण, चांगली नोकरी, भरपूर पैसा मिळवण्याचे समाधान आणि अभिमान फसवे असणे :
मुलाने चांगले गुण मिळवले, त्याला चांगली नोकरी मिळाली आणि पैसा मिळू लागला की, आई-वडील त्यातच धन्यता मानतात. मुलांच्या या गोष्टींचा अभिमान आणि कर्तव्यपूर्तीची जाणीव त्यांचा तोंडवळा अन् बोलणे यांतून झळकत असते. प्रत्यक्षात मात्र उलट घडतांना दिसते. जेव्हा मुलगा मोठा होऊन पैसे आणि प्रसिद्धी कमावतो, तेव्हा तो त्याच्या नकळत मनाने आणि स्थानानेही आई-वडिलांपासून दूर गेलेला असतो. मग आई-वडील मुलांच्या आधाराविना वृद्धपणीचे एकाकी जीवन जगतांना दिसतात. ते बोलून दाखवू शकत नसले, तरी ती सल त्यांच्या मनात असल्याचे जाणवते. काही जणांना तर वृद्धाश्रमात रहाण्याचीही वेळ येते, म्हणजे ज्याच्या सुखासाठी अट्टाहास केला, तोच मुलगा आता वृद्धाश्रमात आई-वडिलांकरता सेवा विकत घेतो. यावरून ‘वर उल्लेखिलेले समाधान आणि अभिमान किती फसवे असतात’, हे लक्षात येते.

५. मुलांमध्ये धर्माचरणाचे संस्कार आणि कौटुंबिक अन् सामाजिक कर्तव्यांची जाणीव रुजवणे, हे आई-वडिलांचे कर्तव्य ! : पालकांनी ‘मुलांनी अभ्यास करून चांगले गुण मिळवावेत’, यासाठी धडपड अवश्य करावी; परंतु त्यासह मुलांवर धर्माचरणाचे संस्कार करणे अन् कौटुंबिक, तसेच सामाजिक कर्तव्यांची जाणीव त्यांच्यामध्ये रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. ते आई-वडिलांचे कर्तव्यच आहे, तरच मुले स्वतःचा संसार सांभाळून आई-वडिलांचाही योग्य प्रकारे सांभाळ करतील. आई-वडिलांवर वृद्धपणी मुलांच्या आधाराविना एकाकी जीवन जगण्याची वेळ न येता, त्यांना समाधानाने जीवन जगता येईल.

६. स्वत: ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करून मुलांवरही साधनेचे संस्कार केल्याने निखळ आनंद घेता येणे : त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते, ‘प्रत्येकच आई-वडिलांनी स्वत: ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करावी आणि मुलांवरही साधनेचे संस्कार करावेत, जेणेकरून मुलांची त्यांच्या भावी जीवनात खरी प्रगती होईल आणि त्याचा निखळ आनंद आई-वडिलांना अन् त्यांच्यासमवेत त्या मुलांनाही अनुभवता येईल.’

– श्रीमती मेघना वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०१९)