महामंडलेश्‍वर स्वामी डॉ. मुकुंददास महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२१ – हिंदी’चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आणि संकेतस्थळ यांचे प्रकाशन

धर्मज्ञानाने मनुष्याचे हृदय जागृत करणारे ‘सनातन पंचांग’ ! – महामंडलेश्‍वर स्वामी डॉ. मुकुंददास महाराज

‘सनातन पंचांग २०२१’ या अ‍ॅपचे प्रकाशन करतांना महामंडलेश्‍वर स्वामी डॉ. मुकुंददास महाराज

जबलपूर (मध्यप्रदेश) – सनातन पंचांगाचा उपयोग केवळ तिथी पहाण्यासाठी न करता, आपला अभ्यास आणि ज्ञान वाढवण्यासाठी करावा. हेच ज्ञान पुढे नवीन पिढीमध्ये वृद्धींगत होते. हे पंचांग धर्म आणि अध्यात्म यांच्या ज्ञानाने मनुष्याचे हृदय जागृत करणारे आहे, असे कौतुकोद्गार येथील श्री गुप्तेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी मुकुंददास महाराज यांनी येथे केले. त्यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२१ – हिंदी’चे ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’ आणि संकेतस्थळ यांचे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, सनातन संस्थेचे श्री. अनिल गणोरकर अन् अजिंक्य गणोरकर उपस्थित होते.

‘सनातन पंचांग २०२१’मध्ये धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सोपी माहिती दिली आहे. यात पंचांग आणि मुहूर्त यांसमवेतच सण, व्रते, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म रक्षण इत्यादी विविध विषयांवरील सर्वांगीण उपयुक्त माहितीही देण्यात आली आहे. आयुर्वेद, उपचारपद्धती, अध्यात्म, हिंदु राष्ट्र आदींविषयी विविधतापूर्ण माहितीने नटलेले हे ‘अ‍ॅप’ सर्वसाधारण हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक असल्यामुळे हिंदु सामाजाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

तिथी, दिनांक, दिनविशेष यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण ‘विजेट’सह हे ‘अ‍ॅप’ ‘गूगल प्ले’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेे. या पंचांगामध्ये वर्ष २०२० च्या मासांचीही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे जानेवारीची प्रतीक्षा न करता आताही हे पंचांग ‘डाऊनलोड’ करता येऊ शकते.